वाखरी येथील डेंग्यू रुग्णांचा आकडा वाढला

 वाखरी (ता. पंढरपूर) येथे शुक्रवार अखेर चौघांना डेंग्यूची लागण झाली होती. आता याचा आकडा वाढत सहावर गेला असून, सहा जणांचे रक्त तपासणीसाठी सोलापूर येथे पाठविले आहे. 
वाखरी (ता. पंढरपूर) येथे घाणीचे साम्राज्य पसरल्याने गावातील नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे. सध्या यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मागील अनेक दिवसांपासून नागरिकांसह खुद्द ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकाला गावात स्वच्छता करण्याच्या सूचना देऊन देखील ग्रामसेवकाने स्वच्छता मोहीम राबवली नाही. यामुळे ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याने अकार्यक्षम ग्रामसेवकावर कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य संग्राम गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

शनिवारी आरोग्य विभागाने वाखरी येथील वैशाली सर्जेराव पांढरे, मीरसाब मुलाणी, वर्षा लक्ष्मण पोरे, रोहित बजरंग पांढरे, सुनीता बजरंग पांढरे, करण नवनाथ पोरे आदी सहा जणांचे रक्त तपासणीसाठी सोलापूर येथे पाठवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली. 
वाखरी येथील चौघांना डेंग्यूची लागण झाली असून सहा जणांचे रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्यात येत असून आरोग्य विभागाच्या वतीने फवारणी करण्यात येत आहे. याचबरोबर २७९ घरांतील साठलेले पाणीसाठे नष्ट करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबवेत असून गावातील गटारी, खड्डे, बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments