बाटली बंद पाणी विक्रीसाठी बोगस कंपन्यांना “पूर’!नागरिकांच्या जिवाशी होतोय खेळ : महिन्याला लाखोंची उलाढाल– बेकायदा पाणी विक्रीला वेसण कोण घालणार?– अन्न औषध प्रशासनाची बघ्याची भूमिका

बाटली बंद पाणी विक्रीसाठी बोगस कंपन्यांना “पूर’!

नागरिकांच्या जिवाशी होतोय खेळ : महिन्याला लाखोंची उलाढाल – बेकायदा पाणी विक्रीला वेसण कोण घालणार?
– अन्न औषध प्रशासनाची बघ्याची भूमिका



पिंपरी,  (प्रतिनिधी) – उन्हाचा पारा चाळीशीच्या पुढे सरकल्याने अंगाची काहिली शमविण्यासाठी पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. नागरिकांची पाण्याच्या बंद बाटल्यांना पसंती असल्याने शहरातील सार्वजनिक पाणपोया लुप्त झाल्या आहेत. नेमका याचाच गैरफायदा घेत अनेक बेकायदेशीर कंपन्यांचा एक लिटरपासून वीस लिटरचा पाणी विक्री व्यवसाय जोरदारपणे सुरु आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या हातात देखील हा व्यवसाय केवळ पाहत राहण्याखेरीज फारसे काही उरलेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकायदेशीर व्यवसायाला वेसण नेमकी घालायची कुणी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
उन्हामुळे तहान भागविण्यासाठी नागरिकांची पहिली पसंती बंद बाटलीतील निर्जंतुक शुद्ध पाण्याला दिली जात आहे. अलीकडच्या काळात नागरिकांमध्ये आरोग्याविषयी वाढलेल्या जागरुकतेमुळे सुमारे वीस लाख लोकसंख्येच्या शहरात बोटावर मोजण्याइतपत सार्वजनिक पाणपोई पहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षात बाटली बंद पाणीविक्री करणाऱ्या बोगस कंपन्यांची संख्या देखील झपाट्याने वाढली आहे. महामार्गालगतची रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये सर्रासपणे या बेकायदेशीर कंपन्यांच्या पाण्याची विक्री केली जात आहेत. यामुळे नामांकीत ब्रॅण्डच्या पाणी विक्रीला तगडे आव्हान निर्माण झाले आहे.
शहरातील रेस्टॉरंट, हॉटेल्स व व्यापारी संकुलातील कार्यालयांमध्ये दिवसाकाठी दोन लाख लिटर पाण्याच्या बाटल्यांची विक्री होत आहे. उन्हाळ्यामुळे या मागणीत 50 टक्के वाढ झाली आहे. या बोगस कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारची शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता केवळ बाटल्या खपविण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे एक लिटर ते 20 लिटरच्या जारची वाहतूक करणारी वाहने सर्रासपणे दिसत आहेत.
कमी गुंतवणुकीत मोठा फायदा असे या व्यवसायाकडे पाहिले जात आहे. यामुळे अनेकांचा या व्यवसायात शिरकाव झाला आहे. काही जणांनी संबंधित यंत्रणेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प उभारले आहेत. मात्र, त्यामध्ये पाणी शुद्धीकरणाऐवजी जास्तीत जास्त बाटल्या भरुन खपविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक जणांकडून महापालिकेच्या नळकोंडाळ्यांवरून जारमध्ये पाणी भरुन त्याची शहरभर विक्री केली जात आहे. कॉर्पोरेट ऑफीसेस, कंपन्या व कार्यालयांमध्ये 20 लिटरचे जार हमखासपणे पहायला मिळत आहेत. यावरुन या व्यवसायातील लाखो रुपयांच्या उलाढालीचा अंदाज लावता येऊ शकतो.
भरमसाठ “मार्जिन’मुळे चांदी
बाजारात असलेल्या नामांकीत ब्रॅण्डच्या एका लिटरच्या एक डझन बाटल्यांचा बॉक्‍स 135 ते 140 रुपयांना उपलब्ध आहे. तर 20 लिटर जारची किंमत 80ते 100 रुपयांना विक्री होते. मात्र. या बोगस कंपन्यांच्या एक लिटरच्या एक डझन बाटल्यांचा बॉक्‍स अवघ्या 65 ते 70 रुपयांना उपलब्ध होत आहे. तर वीस लिटरच्या जारची विक्री चाळीस ते पन्नास रुपयांना होत आहे. रेस्टॉरंट व हॉटेल्सला हे दर परवडणारे असल्याने या बोगस कंपन्यांच्या बाटल्या सर्रासपणे विक्रीस ठेवल्या आहेत.
एका कारवाईनंतर परिस्थिती “जैसे थे’
कोणताही परवाना नसताना बेकायदेशीरपणे पाणी विक्री करणाऱ्या चिखली, शेलारवस्ती येथील एका कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने दोन वर्षभरापुर्वी कारवाई करण्यात आली होती. तत्पूर्वी, खेड तालुक्‍यातील दोन कंपन्यांवर अशी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आजपर्यंत अशा एकाही बेकायदेशीर कंपनीवर कारवाई करण्यात आलेली नाही.
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दोन वर्षांपूर्वी चिखली व खेडमध्ये कारवाई करण्यात आली होती. मात्र. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार हा व्यवसाय सीलबंद बाटली पाणी या व्याख्येत येत नाही. त्यामुळे आता आमच्या विभागाकडून या व्यवसायिकांना व्यवसाय परवाना किंवा अन्य बाबींची परवानगी दिली जात नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून आमच्या विभागाचे कामकाज केले जाते.
– ए. जी. भुजबळ, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे.

Post a Comment

0 Comments