पंढरपूर - जात, धर्म, पंथ हे विचार प्रतिगामी आहेत .आपण पुरोगामी महाराष्ट्रात असताना अशा जाती धर्माची जळमटं दूर सारून खोटे आश्वासन देणाऱ्या मंडळींना बाजूला ठेवत विकासाकडे घेऊन जाणारे सरकार दिले पाहिजे असे आवाहन सोलापूर लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केले .
शुक्रवारी पंढरपूर येथील शिवतीर्थावर झालेल्या मातंग समाज मेळाव्यात ते बोलत होते . यावेळी व्यासपीठावर आमदार भारत भालके , तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील पानीवकर ,दिनकर मोरे, ज्ञानेश्वर खंडागळे , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, नागेश गंगेकर , ऍड.राजाभाऊ भादुले आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी आमदार भारत भालके यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे ..पाच वर्षांपूर्वीचे शेतीमालाचे भाव आणि आजचे भाव यातील तफावत पाहूनच हे सरकार केवळ उद्योगपतींच्या हिताचे आहे, हे शेतकऱ्यांचे नाही हे स्पष्ट होते. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील केंद्राच्या योजनादेखील रखडल्या. या तालुक्याला शासनाचा निधी मिळाला नाही हा दुजाभाव या सरकारने केला आहे ..त्यामुळे आता यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे .
यावेळी ज्ञानेश्वर खंडागळे यांनी सांगितले की , सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत सुशीलकुमार शिंदे यांनी बारा बलुतेदारांचे प्रश्न सोडविले.. रामोशी, जोशी - जोशी कैकाडी अशा घटकांकरिता खऱ्या अर्थाने वंचितांचे सरकार म्हणून त्यांनी राज्य कारभार केला त्यामुळे हाच खऱ्या अर्थाने वंचित आणि बहुजन घटकाचा खरा उमेदवार आहे. म्हणून कॉंग्रेसचे उमेदवार असलेले शिंदे यांच्या मागे हा संपूर्ण समाज असल्याचे त्यांनी सांगितले या सभेला प्रचंड गर्दी झालेली होती.
0 Comments