लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघांत आज मतदान होत असून, रविवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. या टप्प्यात विद्यमान १० खासदार पुन्हा आपले भाग्य आजमावित आहेत. रत्नागिरी- सिंधुदुर्ग, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, रायगड या मतदारसंघांतील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज १४ मतदारसंघांतील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे आणि भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात लढत होत आहे. ही लढत शरद पवार विरूध्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशीच आहे. भाजपने आपले सर्व पत्ते खुले केले असून, राष्ट्रवादीला चहुबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच वेळी राष्ट्रवादीनेही हा आपला बालेकिल्ला कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. ही जागा दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. नरेंद्र मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या. ही लढत शरद पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने सर्व फिल्डींग लावल्यामुळे राष्ट्रवादीला ही लढाई अवघड जाणार नाही.

0 Comments