सोलापूर, दि. 18 :- सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी ( 42- अ.जा.) शांततेत आणि निर्भयपणे मतदान झाले, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिली.

डॉ. भोसले यांनी सांगितले की, ‘ सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या सर्व मतदान केंद्रावर सकाळी अभिरुप मतदान ( मॉकपोल) घेण्यात आले. यानंतर सकाळी 7 वाजता प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली. मतदान प्रक्रिया दरम्यान 18 बॅलेट यनिट, 15 कंट्रोल युनिट आणि 29 व्हीव्हीपॅट मशिन मध्ये बिघाड झाल्याने ती बदलण्यात आली. यामुळे वेळ झाल्याने संबंधित मतदान केंद्रावर सायंकाळी सहा वाजता जे मतदार उपस्थित होते त्या सर्व मतदारांचे मतदान करुन घेतले गेले.’
काही उमेदवारांनी ईव्हीएम मध्ये बिघाड असून सर्व मते एका विशिष्ट उमेदवाराला मिळतात अशी तक्रार माध्यमांसमोर केली होती. याबाबत संबंधित मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे शहानिशा केली असता प्रत्यक्षात मतदाराने अशी कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नाही, त्यामुळे यामध्ये काही तथ्य नसल्याने डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.
डॉ. भोसले यांनी सांगितले की, मोहोळ येथे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते जमा झाल्यामुळे किरकोळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलीसांकडून त्वरित हा जमाव पांगविण्यात आला. सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.01 टक्के इतके मतदान झाले अशी माहितीही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.
0 Comments