24 तास ऑन ड्युटी राहुन आपले कर्तव्य पार पाडणार्या महाराष्ट्र पोलीसांच्या डोक्यावर लवकरच आकर्षक अशी बेसबॉल कॅप दिसणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी पोलीस गणवेशात समावेश करण्यात आलेल्या या अतिरिक्त कॅप संदर्भातील परिपत्रक काढले आहे.

या कॅपची पकड घट्ट असल्याने कर्तव्य पार पाडताना ती डोक्यावरून पडण्याची शक्यता फार कमी आहे. तसंच या कॅपमुळे उन्हापासून चेहरयाचे संरक्षण होईल. बेसबॉल प्रकारातील कॅपचा अतिरिक्त कॅप म्हणून समावेश झाला असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सर्व घटक प्रमुखांनी आपल्या मनुष्यबळाच्या संख्येप्रमाणे या कॅप तयार करून घ्याव्यात. सर्व पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना त्या उपलब्ध करून द्याव्यात. नवीन कॅप तयार करताना ही नमुना कॅपसारखीच राहिल यामध्ये घटक कार्यालयाच्या स्तरावर कोणतेही फेरबदल करू नयेत. तसंच गणवेशासाठी ५ हजार १६७ रूपये या रक्कमेतून कॅपचा खर्च भागवण्यात यावा, असेही पत्रात नमूद केले आहे.
पोलीस कर्मचार्यांना होडीचा आकार असणारी कॅप वापरतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जुनी कॅप डोक्यात व्यवस्थित न बसणे, पाठलाग करताना कॅप पडणे आदी प्रकार घडत असल्यामुळे या नव्या बेसबॉल कॅपच्या वापराचा पर्याय समोर आला. महाराष्ट्र पोलिसांची नवी बेसबॉल कॅप नेव्ही ब्लू रंगाची असून त्यावर लाल रंगाची पट्टी आणि दर्शनी भागावर महाराष्ट्र पोलीस दलाचे बोधचिन्ह आहे.



0 Comments