राज्यात कोकण वगळता इतर बहुतेक भागांमध्ये बुधवारी कमाल तापमान चाळीस अंशांच्या दरम्यान नोंदले गेले. कोरड्या हवामानामुळे कमाल तापमानाचा पारा चढता राहण्याची शक्यता असून, वायव्य, मध्य भारतासह महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत दिवसाच्या तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. गुरुवारी विदर्भात; तर शुक्रवार ते रविवार (२६ ते २८ एप्रिल) दरम्यान विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाटयेण्याची शक्यताही 'आयएमडी'ने वर्तवली आहे.
दरम्यान, राज्यात बुधवारी सर्वाधिक तापमान अकोला येथे ४५.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. कोरड्या हवामानामुळे राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत कमाल तापमानाने चाळीशी गाठली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागांमध्येही उष्णतेचा दाह वाढत असून, मध्य महाराष्ट्रात मालेगाव येथे ४२.८; तर मराठवाड्यात परभणी येथे ४४.१ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान नोंदले गेले. कोकणात मात्र, कमाल तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

राज्यातील विविध शहरांत बुधवारी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुढीलप्रमाणे -
मध्य महाराष्ट्र : पुणे ४१.१, कोल्हापूर ४०, महाबळेश्वर ३४.६, नाशिक ४०.९, सांगली ३९.५, सातारा ४०.६, सोलापूर ४१.६, मराठवाडा : उस्मानाबाद ४१, औरंगाबाद ४१.६, बीड ४२.७, विदर्भ : अमरावती ४४, बुलडाणा ४१.७, ब्रह्मपुरी ४४.७, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४२, नागपूर ४३.४, वाशीम ४२, वर्धा ४३.९, यवतमाळ ४३




0 Comments