मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेऊन भाजपवर टीका करत आहेत. मात्र, लग्न नसताना राज ठाकरे नेमकं कुणासाठी नाचतात, अशी खोचक टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेकडर यांनी अहमदनगर येथे केली आहे.

मनसेने लोकसभेमध्ये उमेदवार दिले नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना राजकीय क्षितीजावरून हद्दपार करण्याचे आवाहन राज ठाकरे सभांमधून करत आहेत. भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची परिस्थिती डबघाईस आली आहे. त्यामुळे या मंडळींना पुन्हा सत्ता देऊ नका असा, जोरदार प्रचार राज करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच राज यांनी मी काय प्रकाश आंबेडकर आहे का दोन देता का? तीन देता का? अशी खिल्ली उडवली होती. त्यानंतर आंबेडकरांकडून कोणतेही उत्तर आले नव्हते. राज यांच्यावर भाजपातर्फेही जोरदार टीका करण्यात येत आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांची फैरी सुरु झाल्या आहेत. मात्र आंबेडकरांच्या टीकेला राज काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


0 Comments