६०० हून अधिक विद्यार्थ्यांना झाला याचा फायदा
पंढरपूरः- शासनाच्या एम.एच.टी.-सी.ई.टी. २०१९ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षेचा सराव व्हावा म्हणून शासनानेच ठरविलेल्या सराव परीक्षेची फेरी आज स्वेरीमध्ये संपन्न झाली. याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून आज झालेल्या सराव परीक्षेत सोलापूर जिल्ह्यासह सांगली, अहमदनगर, सातारा आणि उस्मानाबाद जिल्ह्यामधून जवळपास ६०० च्या आसपास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया विभागाचे अधिष्ठाता डॉ.पी. एस. कचरे यांच्या नेतृत्वाखाली कॉम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील तीन स्वतंत्र वर्गात सराव परीक्षा सुरळीतपणे पार पडली. स्वेरीमध्ये एक-एक तासाच्या चार वेगवेगळ्या स्लॉटमध्ये सराव परीक्षा घेण्यात आली. यावेळी स्वेरीतर्फे परीक्षा संबंधित सोय उत्तमरीत्या करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाहीत.

अभियांत्रिकी व फार्मसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी राज्य शासनाची मुख्य एम.एच.टी.-सी.ई.टी.२०१९ ही परीक्षा साधारण दि.२ मे ते दि.१३ मे २०१९ दरम्यान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर स्वेरीमध्ये सराव परीक्षेचे (मॉक टेस्टचे) आयोजन केले होते. सोमवारी (दि. २२) सकाळी १० पासून स्वेरीमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी सराव परीक्षेच्या निमित्तने येत होते. पूर्ण चार्जिंग केलेला अँड्रॉईड मोबाईल हँडसेट व परीक्षेसाठी आवश्यक साहित्य घेवून परीक्षार्थी वेळेपेक्षा एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. परीक्षा सुरु असताना अधून मधून प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. कचरे व परीक्षक परीक्षा हॉलची पाहणी करुण विद्यार्थ्यांना काही अडचणी येतात का याची पाहणी करत होते. ही सराव परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी अभियांत्रिकीच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोंगे यांनी अचानक परीक्षेच्या ठिकाणी येवून ही सराव परीक्षा विनामूल्य असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला आणि सर्व विद्यार्थ्यांना एम.एच.टी.-सी.ई.टी. २०१९ परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. येत्या मे महिन्यात शासनातर्फे होणाऱ्या एम.एच.टी.-सी.ई.टी. २०१९ या मुख्य परीक्षेच्या दृष्टीने स्वेरीतील ही सराव परीक्षा महत्वाची असून या निमित्ताने स्वेरीने उत्कृष्ठ भूमिका निभावली व याचे उत्तम नियोजन केले असल्याची प्रतिक्रिया परीक्षार्थ्यांनी यावेळी दिली.
0 Comments