पुणे दि. 22 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे विभागातील प्रत्येक जिल्ह्यात माध्यम सनियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातही स्वतंत्रपणे सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज सनियंत्रण कक्षाला भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला.
पुणे विभागातील एकूण 10 लोकसभा मतदार संघापैकी दुसऱ्या टप्प्यात सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रीया पार पडली. तर तिसऱ्या टप्प्यात विभागातील पुणे, बारामती, सातारा, माढा, सांगली, हातकणंगले, कोल्हापूर या सात लोकसभा मतदार संघासाठी मंगळवार दि. 23 एप्रिल 2019 रोजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. तर चौथ्या टप्प्यात दि. 29 एप्रिल 2019 रोजी मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदार संघात मतदार प्रक्रीया पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निष्पक्षपणे आणि शांततेत पार पडण्यासाठी सर्व प्रकराची खबरदारी प्रशासनाच्यावतीने घेण्यात आली आहे.
या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रीये दरम्यान आदर्श आचार संहितेचा भंग होत आहे का? हे तपासण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात माध्यम सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह सर्व माध्यमांवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. या कक्षाला भेट देवून डॉ. म्हैसेकर यांनी कामकाजाची पहाणी केली. या वेळी कक्षात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी उप आयुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड उपस्थित होते.
0 Comments