भुवैकुंठ पंढरपूर शहरातील गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांची करडी नजर असल्याचे उदाहरण समोर आले असून विक्रीसाठी आणलेल्या देशी कट्टयासह दोन युवकांना पंढरपूर शहर पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली असल्याने पंढरीतील गुन्हेगारी संपुर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी पोलिस यंत्रणा सरसावली असल्याचे दिसून येते आहे.
पंढरपूर येथील हॉटेल अमरजवळ देशी कट्टा विक्रीसाठी घेवून काही लोक येणार असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलिसांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सोमवारी (५ मे) रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रवीण बाळासाहेब शेळके (वय २८, कोन्हेरी, ता. मोहोळ) आणि तात्या लक्ष्मण जाधव (वय २८, पेनूर, ता. मोहोळ) या दोघांना ताब्यात घेतले.
यावेळी प्रवीण शेळके याच्या कमरेला असलेला देशी कट्टा ताब्यात घेण्यात आला. तसेच दोघांकडील मोटारसायकल, मोबाईल असा ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला.

(पोलिसांनी ताब्यात घेतलेले गावठी पिस्तूल)
मोटरसायकलसह आरोपींना ताब्यात घेऊन आज त्यांना न्यायालयासमोर उभे केले. यावेळी आरोपींनी हा गावठी कट्टा कोणाला विक्रीसाठी आणला व यामागचे कारण काय याबाबत अधिक तपासासाठी पोलिस कस्टडी मागितली असता तीन दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले .
पंढरपूर उपविभागीय पोलिसअधिकारी डॉ.सागर कवडे, पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम,पोलीस हेडकॉन्स्टेबल सुजित उबाळे,गजानन माळी,श्रीराम ताटे,ए.पी.आय.हणुमंत देशमुख , पो.ना.मच्छिंद्र राजगे ,प्रवीण पाटील यांनी कामगिरी केली . पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


0 Comments