बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला येथील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करताना सापडलेले गुप्तधन काही लोकांनी हडप करण्याचा प्रयत्न केला होता. यातील काही सोने पंढरीतील एका व्यापाऱ्याकडे आणुन मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा दिला होता. या प्रकरणी पंढरीतील सोन्याचा मुलामा देणारे व्यापारी अमित मधुकर आप्रे यांना वैराग पोलिसांनी पंढरपूर मधून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे
याप्रकरणी उपळे येथील दिलीप कल्याण बुरगुटे यांनी महादेव बाबू माळी, विकास अप्पासाहेब पाटील, सुर्यकांत नवनाथ बरबडे, सतेंजय शशिकांत कुलकर्णी, महादेव दगडू मांजरे, गोरख दिगंबर बुरगुटे, विलास कल्याण बुरगुटे, विनोद गोवर्धन बूरगुटे, नंदकुमार सूखदेव बुरगुटे, अरविंद कचरूलाल वखारिया, नवनाथ मुरलीधर जगदाळे सर्व रा. उपळे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यातील आरोपींनी सापडलेल्या सोन्यापैकी काही सोने पंढरीतील अमित मधुकर आप्रे यांच्या आनंद मेटल या दुकानात आणले, आप्रे यांच्याकडून मंदिरावर बसविण्यात येणाऱ्या तांब्याच्या कळसाला सोन्याचा मुलामा देण्याचे काम करवून घेतले. ही माहिती समजताच वैराग पोलिसांनी अधिक माहितीसाठी आप्रे यांना वैराग येथे आणले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बी. एस. कापसे यांनी दिली.
उपळे दुमाला येथील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार जानेवारी २०१४ मध्ये करण्यात आला. तेंव्हा खोदकाम करताना सापडलेल्या गुप्त धनाची परस्पर विल्हेवाट लावल्याचे हे प्रकरण आहे.





0 Comments