पंढरपूर (प्रतिनिधी):- भाजपाच्या विजयामुळे कोळी जमातीत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. असे मत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
काँग्रेस आय, राष्ट्रवादी पक्षाच्या नेतेमंडळींच्या निष्क्रिय राजकारणाचा भारतीय जनतेला वीट आला आहे. या दोन्ही पक्षाचे नेते मंडळी आपापल्या पिढीतील वारसांना राजकारणात सक्रीय करुन या देशावर हुकूमशाही प्रमाणे राजसत्ता भोगत आलेले आहेत. त्यांची राजसत्तेची ही लालसा दिवसेंदिवस वाढत जावु लागली आहे. या सर्व गोष्टी जनतेनं चांगल्याच ओळखल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांनी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना त्यांची खरी जागा दाखवत, ‘‘तुम्ही आता घरी बसा!’’ असे ठणकावुन सांगितले आहे.
गेल्या कित्येक वर्षापासुन महादेव कोळी जमातीच्या जातीच्या दाखल्यांसह कोळी जमातीच्या नोकर्यांचा प्रश्न काँग्रेस व राष्ट्रवादीने भिजवत ठेवला आहे. या पक्षाच्या नेतेमंडळींनी कायमच आमच्या निवेदनांना केराची टोपली दाखवली, पदोपदी आमचा अपमान करत काही वेळा आम्हाला हाकलुनही दिले. आमच्या जमातीच्या अनेक शासकीय नोकरदारांना कामावरुन काढून टाकले, यामुळे आमच्या जमातीतील काहींनी आत्महत्या केल्या, सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना दक्षिण सोलापूर तालुक्यात 4500 जातीचे दाखले दिले; परंतु जिल्ह्यात इतर कुठेही दाखले दिले नाहीत. त्यामुळे आमच्या समाजातील अनेकांना जातीच्या दाखल्यांपासुन वंचीत रहावे लागले. परंतु भाजपाने मागील 5 वर्षात आम्हाला न्याय देण्यास सुरुवात केली. भाजपाच्या कारकिर्दीत आमच्या जमातीचा एकही शासकीय कमर्र्चारी कामावरुन काढला नाही, आमच्या मागणीनुसार जातीचे दाखले देण्यास पंढरीत प्रारंभ झाला. आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या चंद्रभागेतील स्मारकाला मंजुरी मिळाली. तसेच भाजपाच्या कारकिर्दीत देशातील अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यामुळे आदिवासी महादेव कोळी जमातीमधुन भाजपाच्या विजयामुळे जल्लोष साजरा होत आहे.
या निवडणुकीत आम्ही महर्षी वाल्मिकी संघ आणि महादेव कोळी जमातीनं भाजपाला जाहीर पाठींबा दिला होता. निश्चितच भाजपाच्या विजयामुळे आम्हाला आनंद झाला आहे. याचबरोबर आमच्या जमातीचे इतर प्रलंबीत प्रश्न सुटण्यासाठीच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. आमच्या प्रलंबीत असणार्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा लोकशाही मार्गाने सुरु असलेला लढा मात्र चालुच राहील. असे मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे.





0 Comments