खेडभोसे सोसायटीच्या 13 संचालक आणि 2 माजी सचिवांना कारणे दाखवा नोटीस... खेडभोसे सोसायटी अपहार प्रकरण : 28 जून पर्यंत उत्तर द्या.



भोसे (क.) : वार्ताहर, 
खेडभोसे (ता. पंढरपूर) येथील विविध सहकारी सोसायटीमध्ये झालेल्या अपहाराबाबत सहायक निबंधक डी. एच. मिसाळ यांनी तत्कालीन 13 संचालक आणि माजी दोन सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांन 28 जून पर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

खेडभोसे विकास कार्यकारी सोसायटीचा अवास्तव खर्च, संस्थेचा कारभार सहकार कायद्यानुसार होत नाही तसेच सभासदांचे हित न जोपासता उलट त्यांच्या हितास बाधा आणल्याची लेखी तक्रार माजी सरपंच कालिदास साळुंखे यांनी मागील वर्षी सहाय्यक उपनिबंधक व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली होती. या नंतर सहाय्यक उपनिबंधकांनी संस्थेचे शासकीय लेखा परिक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शासकीय लेखा परिक्षणात सन 2013 ते 2016 दरम्यान संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक व सचिव यांनी नियमबाह्य खर्च करणे, शेतकर्‍यांच्या कर्जाची रक्कम बँकेत न भरता ती रक्कम परस्पर वापरणे यासारख्या गंभीर स्वरूपाचे चुकीच्या पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्यात आले असल्याचे समोर आले होते. स्टेशनरी, प्रवास खर्च, सादील, झेरॉक्स खर्च, मुद्रणालयाचा खर्च, ऑफिस दुरुस्ती यावर झालेला तब्बल 4,47,184 रूपये आणि 9,110 रुपये खर्च हा संशयास्पद आणि अवास्तव केला असल्याच्या ठपका लेख परीक्षण अहवालात ठेवण्यात आलेला आहे.


सोसायटीच्या सचिवांनी प्रत्येक खर्च हा मोघम स्वरुपात केलेला आहे, संस्थेच्या आर्थिक व्यवहारात खर्चाची जी व्हावचर्स लावली जातात त्यामध्ये कोणत्या कामासाठी व किती खर्च केला याचा सविस्तर उल्लेख असणे आवश्यक असते, मात्र जोडलेली व्हावचर्स संशयास्पद असल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.

या तीन वर्षांच्या कालावधी मध्ये सचिवांनी केलेल्या खर्चाची कोणत्याही प्रकारची शहानिशा न करताना मासिक सभेत संचालक मंडळाने त्यास मान्यता दिली आहे. सोसायटीच्या कर्मचार्‍यांवर संचालक मंडळाचे कसल्याही प्रकारचे नियंत्रण नव्हते, त्यामुळे संस्थेच्या झालेल्या नुकसानीस 2013-14 ते 2015-16 या तीन वर्षांच्या कालावधीत कार्यरत असलेले संचालक मंडळ जबाबदार असल्याच्या निष्कर्ष काढण्यात आला आहे.

त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 88 अंतर्गत खेडभोसे विविध कार्यकारी सोसायटीचे तत्कालीन 13 संचालक मंडळ आणि माजी दोन सचिव यांच्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 19 मधील नियम 72 (3) नुसार आरोपपत्र निश्चित करण्यात येणार आहे. याबाबत झालेल्या संशयास्पद व्यवहारांबाबत तत्कालीन संचालक मंडळ आणि दोन माजी सचिव यांनी 10 दिवसात लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश प्राधिकृत चौकशी अधिकारी डी. एच. मिसाळ यांनी दिले आहेत.



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments