July 27, 2019 (संतोष कांबळे)
पंढरपूर- भीमा खोर्यात जोरदार पाऊस सुरू असून पुणे भागात सुरू असलेल्या संततधारेमुळे बंडगार्डनचा विसर्ग शनिवारी सकाळी 50 हजार क्युसेककडे वाटचाल करीत होता. हे पाणी दौंडजवळून उजनीत मिसळणार असल्याने वजा पातळीत असणार्या सोलापूर जिल्ह्याच्या या वरदायिनीची पाणी पातळी झपाट्याने वधारणार आहे आहे. मुळा-मुठा, भीमा उपखोर्यात जोरदार वरूणराजा बरसत आहे.शनिवारी सकाळी उजनीत येणारा विसर्ग हा जरी 1800 क्युसेकचा असला तरी येत्या काही तासांमध्ये यात लक्षणीय वाढ होणार आहे. पुणे बंडगार्डनचा विसर्ग हा 48 हजार 793 क्युसेक इतका वाढला आहे.
मुळा मुठासह पुणे परिसरात होत असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. मागील चोवीस तासात सर्वच धरण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यात कलमोडी 150 मिलीमीटर, चासकमान 88, वडीवळे 195, आंध्रा 153, पवना 179, कासारसाई 109, मुळशी 204, टेमघर 170, वरसगाव 145, पानशेत 145, खडकवासला 70 मि.मी. अशी नोंद आहे. याच बरोबर घोड उपखोर्यात ही पावसाचा जोर असून डिंभे प्रकल्पावर 90 मि.मी.पावसाची नोंद झाली असून या धरणातून 3900 क्युसेक पाणी घोडकडे सोडण्यात आले आहे. तेथील अन्य धरणांवर ही पावसाचा जोर कायम आहे.
दरम्यान नीरा खोर्यात पावसाने जोरदार कमबॅक केले असून गुंजवणीवर 158 मि.मी., देवघर 118, भाटघर 51 तर वीर धरण परिसरात 32 मि.मी. पावसाची नोंद आहे. या पावसामुळे धरणांची पाणी पातळी वेगाने वधारली आहे. वीरमध्ये 68 टक्के तर गुंजवणी 64, देवघर 55 तर भाटघर 51 टक्के भरले आहे. भीमा खोर्यात ही पावसाचा जोर वाढल्याने उजनीला पाणी देवू शकणारी धरणे आता वेगाने भरू लागली आहेत. कलमोडी व कलमोडी 100 टक्के भरले आहे तर वडीवळे प्रकल्प 93 टक्के झाला आहे. मुळशीची वाटचाल टक्केवारीच्या साठीकडे आहे. तर पवना 56 टक्के आहे. भीमेवर चासकमान 71 टक्के भरले आहे. मुळा मुठा उपखोर्यातील साखळी धरण परिसरात जोरदार पर्जन्य बरसत असल्याने तेथील प्रकल्प ही झपाट्याने वधारत आहेत.






0 Comments