महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचा-यांच्या वेतनाच्या अनुदानाची रक्कम नगरपरिषदांना वेळेवर न दिली गेल्याने ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी वेतनासाठी नगरपरिषद कर्मचा-यांना शिमगा करण्याची वेळ आल्याने त्यासाठी राज्याचे अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड, राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर, पुणे विभागाचे अध्यक्ष प्रा.ए.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि.२१ जानेवारी २०२० पासुन राज्यभर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार होते. परंतु राज्यातील कर्मचा-यांनी वेतनासाठी बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शासनाने महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद कर्मचा-यांच्या सहा.वेतन अनुदानाची रक्कम संबंधीत नगरपरिषदेकडे अदा करण्याबाबतचे आदेश पारित केले आहेत.
त्यामुळे कर्मचा-यांचे वेतन येत्या २ ते ३ दिवसात अदा होणार आहेत. याबाबत बोलताना राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने नगरपरिषद कर्मचा-यांना कर्मचा-यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला करणे अपेक्षित आहे. परंतु शासनाकडुन नगरपरिषद कर्मचा-यांच्या वेतनासाठी सहा.वेतन अनुदानाची रक्कम नगरपरिषदांना न दिल्याने व कर्मचा-यांचे वेतन न झाल्याने कर्मचा-यांना ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी शिमगा करण्याची वेळ आली होती.
यापुर्वी नगरपरिषदेच्या फंडातुन कर्मचा-यांचे वेतन वेळेवर अदा केले जायचे परंतु शासनाने नगरपरिषदेचे उत्पन्न असलेले जकात कर बंद करुन नगरपरिषद कर्मचा-यांच्या होणा-या वेतनाची रक्कम शासनाकडुन अदा केली जात होती. त्यासाठी शासन सहाय्यक अनुदान म्हणुन वेतन व सेवानिवृत्ती वेतनाची रक्कम मा.आयुक्त तथा संचालक नगरपरिषद संचालनालय वरळी मुंबई यांच्याकडे वर्ग करते व सदरची रक्कम सदर संचालनालय महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदांना वितरीत करते. परंतु गेल्या २-३ वर्षांपासुन सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम शासनाकडुन नगरपरिषदांना वेळेवर न मिळाल्याने महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचा-यांना दोन ते तीन महिने वेतनापासुन वंचित रहावे लागते व नगरपरिषदांचे सुद्धा उत्पन्न कमी असल्याने कर्मचा-यांचे वेतन करण्यास नगरपरिषद असमर्थ ठरत होती. इतर शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषदेसह सर्व कमचा-यांचे वेतन १ तारखेला अदा केले जाते. मात्र नगरपरिषद कर्मचा-यांना प्रत्येक महिन्याच्या २० ते २५ तारखेपर्यंत वेतनाची वाट पहावी लागते. म्हणुन मकर संक्रांतीसारख्या सणादिवशी सुद्धा शासनाकडुन सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम न मिळाल्याने वेतनासाठी शिमगा करण्याची वेळ कर्मचा-यावर आल्याने २० तारखेपर्यंत सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम शासनाकडुन न मिळाल्यास दि.२१ जानेवारी २०२० पासुन महाराष्ट्रातील प्रत्येक नगरपरिषदे समोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेने दिला होता. संघटनेने बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा देताच शासनाने आज सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम नगरपरिषदांना अदा करण्याचे आदेश काढलेले आहेत. मात्र अशीच परिस्थीती राहिल्यास पुढेही नगरपरिषद कर्मचा-यांचे सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला नगरपरिषदेच्या खात्यावर जमा न झाल्यास प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपासुन दररोज सकाळी ११ वाजता महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदां समोर निदर्शने करुन बोंबोबोंब आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.


0 Comments