पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
सोलापूरमध्ये बापाने पोटच्या मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना घडली आहे. 29 जानेवारीला एका तरुणाचा मृतदेह कुंभारी गावाजवळ सापडला होता. या तरुणाची पित्याकडूनच सुपारी देऊन हत्या करण्यात आली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. वडीलांनीच मुलाचा काटा काढण्यासाठी तीन मारेकऱ्यांना सुमारे 2 लाख रुपयांची सुपारी दिली होती. दरम्यान, या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या मुलाच्या वडीलांसह इतर तीन मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
सुरेश सिध्दलिंग घोंगडे (वय ६२, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) असे वडिलांचे तर, शैलेश सुरेश घोंगडे (वय 31) असे मुलाचे नाव आहे. सुरेश घोंगडे याने संजय ऊर्फ भोजू राठोड (वय २८, मूळ रा. मुळेगाव तांडा, दक्षिण सोलापूर सध्या रा. आशाननगर, सोलापूर), शंकर नारायण वडजे (वय ४७, रा. सेवालालनगर तांडा, ता. उत्तर सोलापूर) व राहुल चंदू राठोड (वय २८, रा. मुळेगाव तांडा) या तिघांना मुलगा शैलेश सुरेश घोंगडे याची हत्या करण्यासाठी 2 लाख रुपयांची सुपारी दिली होती. या सर्वांना अटक केली असून, सध्या त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केल्याची माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, 18 दिवसांआधी कुंभारी गावाजवळ एक तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. स्थानिकांनी तरुणाला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पण पोलिसांना हत्येचा संशय आला. कारण, मुलाच्या गळ्यावर मारल्याच्या खुणा होत्या.
संशयाची सुई मृत तरुणाच्या वडिलांवर येऊन थांबली. तपासाच्या खोलवर गेल्यानंतर वडिलांनी पोटच्या गोळ्याला संपवण्याची सुपारी दिली असल्याचं उघड झालं.
तरुण घरात रोज त्रास द्यायचा. जमिन नावावर करण्यासाठी तो रोज वडिलांशी भांडायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी शेताच्या शेजारी राहणाऱ्या मित्रांना सांगून मुलाला कायमचं संपवण्याची सुपारी दिली. 2 लाखांची सुपारी दिली असल्याची कबुली आरोपी वडिलांनी पोलिसांसमोर दिली आहे. शंकर वर्जे, राहुल राठोड, संजय राठोड अशा तिघांनी सुपारी दिली होती.
पोलिसांनी हत्येचा शोध लावत आरोपी पिता आणि इतर तिघांना ताब्यात घेतलं असून 17 फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, ज्या वडिलांनी मुलाला अखेरचा अग्नी दिला त्याच पित्याने मुलाची सुपारी दिली होती. या घटनेचा उलगडा झाल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
0 Comments