माळाकोळी (जि. नांदेड) : मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न, वृद्ध आईचे आजारपण व घरखर्च या ओझ्यामुळे कर्जबाजारी झालेल्या एका शेतकऱ्याने अखेर हा पर्याय निवडलाच. मात्र, यात त्याच्या बरोबर कोवळ्या मुलानेही आत्महत्या केल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शेतीतून अपेक्षित उत्पन्न नाही आणि कर्जाचा वाढता डोंगर, यामुळे मागील काही दिवसांपासुन विवंचनेत असलेल्या वागदरवाडी (ता. लोहा) येथील शेतकऱ्याने आपल्या मुलासह आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी घडली आहे.
वागदरवाडी येथील केरबा पांडु केंद्रें (वय ४५) व त्यांचा मुलगा शंकर केरबा केंद्रें (वय १७) यांनी सततची नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून ता. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
वागदरवाडी हा भाग कोरडवाहु जमीनीचा भाग आहे या भागात कायम ओल्या व कोरड्या दुष्काळाचा सामना येथील शेतकर्यांना नेहमीच करावा लागतो. केरबा केंद्रे हे अल्पभुधारक शेतकरी होते ते स्वत:च्या शेतात काम करत अन्य ठिकाणी मजुरीने जाऊन संसाराचा गाडा हाकत होते.
या कुटूंबाला तातडीने आर्थीक मदत करण्याची मागणी ग्रामस्थांकडुन केली जात असुन संपुर्ण कर्जमाफीची प्रक्रीयाही वेळेवर पुर्ण व्हावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. माळाकोळी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कराड एस. एस. करत आहे. भाऊ माधव पांडुरंग केंद्रे (वय ४६) यांच्या फिर्यादीवरून माळाकोळी पोलीसात आकस्मिक मृत्युंची नोंद करण्यात आली.
मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, वृद्ध आईचे आजारपण यासह घर खर्च यामुळे ते आर्थीक विवंचनेत होते. त्यांच्यावर बॅंकेसह ईतरही खाजगी कर्ज होते. यामुळे मागील काही दिवसांपासुन ते तणावात वावरत असल्याचे गावातील नागरीक बोलत होते. यातुनच त्यांनी ता. १४ फेब्रुवारी रोजी आपल्या मुलासह जीवनयात्रा संपवली.
त्यांच्यावर शनिवार (ता. १५) फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावकर्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्यांच्या पश्चात पत्नी प्रयागबाई, मुलगी संजीवनी व आई राजाबाई केंद्रे आहेत.
0 Comments