कोरोनाच्या संकटातुन सावरायला पंढरीच्या श्रीविठ्ठल-रुक्मिणी देवस्थानाचा मोठा आधार! मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 कोटींची मदत!

Pandharpur Live- 
कोरोनाच्या संकटातुन सावरण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोना बाधीतांवर उपचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा आदी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्टा चालु केली आहे. या सर्व प्रयत्नांना गरज आहे आर्थिक सहाय्याची. याचसाठी पंढरपूरच्या श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी मदत देण्याची घोषणा आज केली आहे.

कोरोना व्हायरस (कोविड-19) चा वाढता प्रभाव लक्षात घेता, मा.राज्य शासनाकडून नागरिकांसाठी विविध उपाय योजना व सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीने प्रशासनास मेडिकल किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे व पंढरपूर शहर-परिसरातील बेघर व निराधार नागरिकांसाठी फुड पॅकेट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याच सोबत राज्यशासनाला आर्थिक मदत करणे ही काळाजी गरज आहे, ही बाब विचारात घेवून श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी ला रक्कम  1 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय एकमताने घेतला असल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीने एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली.

  सदरचे पत्रक श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समिती चे सदस्य सर्वश्री आ. सुजितसिंह ठाकूर, आ.रामचंद्र कदम, श्री.संभाजी षिंदे, श्रीमती.शकुंतलाताई नडगिरे, डॉ.दिनेषकुमार कदम, श्री.भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, ह.भ.प.ज्ञानेश्‍वर देशमुख (जळगांवकर), अ‍ॅड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, श्री.भागवतभुषण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, सौ.साधनाताई भोसले यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर  सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ ज्ञानश्‍वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री. जोशी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.