सोलापूर- गँगरेप गुन्ह्यातील 3 आरोपींची दुस-या मजल्यावरून उडी... सर्व 11 आरोपी गजाआड!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गँगरेप प्रकरणात 11 आरोपींविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. पहिल्याच दिवशी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली होती. त्यानंतर एक-एक करून 3 आरोपींना अटक केली होती. तर 3 आरोपी हे फरार होते. हे आरोपी मुंदर्गी(गदग, कर्नाटक) येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांना मिळाली. त्यानुसार खेडकर व पोलिस नाईक शंकर मुळे, राजू चव्हाण, पो.कॉ. सनी राठोड, संतोष वायदंडे, विजय निंबाळकर यांचे पथक कर्नाटकात रवाना झाले होते. गुन्हे शाखेचे पोलिस मुंदर्गीत (कर्नाटक) गेले असता पोलिसांना पाहून 3 आरोपींनी इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून उड्या मारल्या. या तिघांचे पाय फ्रॅक्‍चर झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुन्ह्यातील सर्व 11 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या आरोपींविरूध्द 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती या गुन्ह्याचा तपास करणार्‍या सहाय्यक पोलिस आयुक्‍त प्रीती टिपरे यांनी दिली. शहरातील एका अल्पवयीन कॉलेजकुमारीवर गँगरेप केल्याप्रकरणी त्या पीडित मुलीने विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

कर्नाटकात गुरुवारी पहाटे पोहोचल्यानंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. तेथे त्यांना माहिती मिळाली की, आरोपी हे एका इमारतीत गेल्या 5 दिवसांपासून भाड्याने राहत आहेत. पोलिस त्या इमारतीत पोहोचले तेव्हा त्या 3 आरोपींचे 2 साथीदार हे तळमजल्यावरच पोलिसांना सापडले, तर 3 आरोपी हे दुसर्‍या मजल्यावर होते. पोलिस दुसर्‍या मजल्यावर येत आहेत, हे समजताच श्याम राठोड, आनंद राम राठोड व चेतन राम राठोड या तीन आरोपींनी इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून उडी मारली. यावेळी तिघांचे पाय फ्रॅक्‍चर झाले. यावेळी दोन आरोपींना तेथून हलता आले नाही. पण एक आरोपी तशाच अवस्थेत पळत सुटला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.

या तीनही जखमी आरोपींवर तेथेच प्राथमिक उपचार करून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आलेले 8 आरोपी आणि हे तीन जखमी आरोपी असे 11 आरोपीच आहेत. यात इतर आरोपी नसल्याचे प्रीती टिपरे यांनी सांगितले. या गुन्ह्याचा अत्यंत काळजीपूर्वक व बारकाईने तपास करण्यात आला असून 60 दिवसांच्या आत कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रीती टिपरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments