आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनी शिष्यवृृत्तीचा त्याग केल्यास दुर्बल घटकांना शिक्षण मिळेल-डॉ. प्रीतम मुंडे-खाडे

Pandharpur Live online-
नाशिक : अधिक गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांनी शिष्यवृत्ती, शैक्षणिक आरक्षणाचा लाभ सोडण्याची तयारी ठेवली पाहिजे. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे- खाडे यांनी केले. वंजारी समाजातील व्यावसायिक व्यक्तींनी स्थापन केलेल्या असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल्स (एओडब्ल्यूपी) संस्थेच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने अध्यक्षस्थानी होते.

यावेळी बोलताना प्रीतम मुंडे म्हणाल्या, उज्ज्वला योजनेद्वारे अनेक श्रीमंत व्यक्तींनी स्वयंपाकाच्या गॅसची सबसीडी सोडली. त्याचा समाजाला लाभच झाला. शासनाने केलेल्या आवाहनाला तो प्रतिसाद होता. त्याप्रमाणे आगामी काळात सधन व्यक्तींनी त्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा त्याग केला तर समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळू शकेल.

त्याचप्रमाणे, ओबीसी जनगणनेविषयी हा खुपच महत्वाचा विषय आहे. बिगर राजकीय संस्थांनी त्यासाठी पाठपुरावा केला तर अधिक उपयुक्त ठरेल. समाजात जातीनिहाय लोकसंख्या कळाली, तर संबंधित वर्गाला किती आरक्षण द्यायचे ही बाब स्पष्ट होते. ओबीसी जनगणना होणे काळाची गरज असून, त्यास राजकीय रंग द्यायला नको. सर्वसामान्य जनतेनेही या मागणीला पाठिंबा द्यायला हवा. संसदेत या संदर्भात पाठपुरावा करणार आहे.

Post a Comment

0 Comments