Pandharpur Live Online-
सोलापूर - भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या अवैध ठरलेल्या जातप्रमाणपत्रावरुन सोलापूरमधील जागेवर पोटनिवडणूक होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. कोणत्या पक्षाकडून कोण निवडणुकीला उभे राहणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण त्यापूर्वी एका महाराजाने भाजपकडून ही पोटनिवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील चडचड येथील व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक कटकधोंड असे या महाराजांचे नाव आहे. त्यांनी भाजपकडून ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या महाराजांनी खासदार जयसिद्धेश्वर विरोधात हिंदुस्थान जनता पार्टीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांनी केवळ 9 रुपये संपत्ती दाखवली होती. तर 45 हजारांचे कर्ज असल्याच्या उल्लेख शपथपत्रात केला होता. त्यामुळे हे महाराज चर्चेत आले होते.
दरम्यान, सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरवला आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. याविरोधात प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु केली आहे. तर जयसिद्धेश्वर यांनी जातपडताळणी समितीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभेची पोटनिवडणूक लागणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत.


0 Comments