कोरोनाच्या वादळात पत्रकार वार्‍यावर..अनेकांवर उपासमारीची वेळ


पंढरपूर प्रतिनिधी:कोणतीही घटना घडली की आपल्याला घरपोच बातमी क्षणात मिळते.अगदी एक दोन क्लिकवर ही माहिती दोन तीन सेकंदात आपल्याला घरबसल्या उपलब्ध होते.मात्र ही महिती एका क्षणात उपलब्ध करून देण्यासाठी एक घटक मात्र अहोरात्र झटत असतो.जो स्वतः कधीच प्रसिद्धीस येत नाही मात्र इतरांच्या चांगल्या कामांना व बातम्यांना प्रसिद्धी मिळावी म्हणून अगदी तुटपुंज्या मानधनावर झटत असतो.कित्येकदा यासाठी जीवाचा धोकाही पत्करतो.पण समाजाला घरबसल्या माहिती पुरवतो.ही माहिती खरी व विश्वासार्ह असावी यासाठी तो कायम कायम प्रयत्नशील असतो.ह्या बातम्या व त्यांची माहिती मिळवत असताना प्रशासनासोबतच अनेक अवैध धंदेवाल्या गावगुंडांचा त्रासही त्याला एकट्याला निमूटपणे सहन करावा लागतो पण तो तरीही तुजपुंज्या मानधनावर आपले काम करत राहतो.
         सध्याही कोरोनाच्या भीतीने सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे.देशात लॉकडाऊन सुरू असतानाही आणि कोरोनामुळे जीवताची भीती असल्याने लोकांनी घरी राहणेच पसंद केले आहे.शासनाने आपल्या कर्मचार्‍यांनाही केवळ 5% लोकांवर काम करण्याचे आदेश दिलेले आहेत.परिस्थिती इतकी बिकट आहे की अनेक खासगी डॉक्टरही आपले व्यवसाय बंद करून घरी बसलेले आहेत.मात्र पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचार्‍यांसोबत पत्रकारही 24 तास जागता पहारा देत आपले काम पार पाडत आहेत. घरबसल्या लोकांना क्षणाक्षणाला ताज्या बातम्या व माहिती मिळावी म्हणून पत्रकार मात्र जीवाचा धोका पत्करून दिवसरात्र एक करत आहेत.यामुळे घरच्यांपासूनही त्यांना विलग राहावं लागत आहे.मात्र शासनाच्या प्रत्येक सूचना ,योजना व विश्वासार्ह अचुक माहिती संपूर्ण देशभरातील जनतेपर्यंत पोहोचवणार्‍या पत्रकारांना मात्र शासनाने वार्‍यावर सोडल्याचे चित्र आहे.अगदी तुटपुंज्या मानधनावर अगोदरच कशीबशी चालणारी पत्रकारांची व त्यांच्या कुटुंबाची मात्र सध्या दयनीय अवस्था झाली आहे.त्यातच सरकारकडून मात्र पत्रकार बांधवांसाठी कोणत्याही मदतीची घोषणा न करण्यात आल्याने पत्रकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे कोणत्याही पत्रकाराला आपल्या जीवाला मुकावे लागले तर त्याचे कुटुंब वार्‍यावर राहणार हे मात्र नक्की.

कोरोनामुळे जाहिराती ठप्प झाल्याने उपासमारीची वेळकोरोनाच्यासाथीनंतर  जवळपास सर्वच उद्योग ठप्प झाले आहेत.त्यातच देशात संपुर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने सर्व उद्योग व्यवसाय बंद करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.त्यामुळे आजवर ज्या जाहिरातींवर पत्रकारांची उपजीविका चालते त्या जाहिराती मागणेही कठीण होऊन बसले आहे.सर्व व्यवहार बंद असल्याने जाहीरात कशी देणार असा प्रश्न व्यवसायिकांना पडल्याने पत्रकारांना जाहिरात मिळणे जवळपास बंद झाले आहे.त्यामुळे कित्येक पत्रकारांची कुटुंबे चालविणेही कठीण होऊन बसले आहे.त्यामुळे सरकारने पत्रकारांना विशेष मदत करण्याची मागणी जोर धरत आहे.