कुकान विस्डम ॲकॅडमी तर्फे स्पर्धा परीक्षेचे ऑनलाईन वेबिनार संपन्न


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वेरी च्या विद्यार्थ्यांनी कुकान विस्डम ॲकॅडमी आयोजित स्पर्धा परीक्षेबाबतच्या   ऑनलाईन वेबिनार मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला 

पंढरपूर – कोरोना मुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन च्या काळामध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानसाधनेत कुठेही खंड पडू दिलेला नाही. एका बाजूला शैक्षणिक ज्ञानार्जनासाठी स्वेरीचे प्राध्यापक ऑनलाइन व्हिडिओज, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, सॉफ्ट कॉपी मधील नोट्स अशा विविध पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेतच परंतु त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी ज्ञान संकलनाचे विविध मार्ग स्वेरीचे विद्यार्थी अवलंबताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून पुणे येथील कुकान विस्डम ॲकॅडमी तर्फे आज दि.१२ एप्रिल २०२० रोजी दुपारी ३:०० वाजता  यूपीएससी स्पर्धा परीक्षा संदर्भात झूम अॅप्लिकेशन च्या माध्यमातून फ्री वेबिनार आयोजित करण्यात आला  होता. या वेबिनारला स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी घर बसल्या प्रचंड प्रतिसाद दिला. 

स्वेरी विद्यार्थ्यांना विविध  स्पर्धा परीक्षांसाठी नेहमीच प्रोत्साहित करत असते आणि त्या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा. यशपाल खेडकर सतत प्रयत्नशील असतात. या पूर्वी देखील प्रशासकिय सेवेतील अनेक दिग्गजांनी स्वेरी कॅम्पस ला भेट देऊन विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केलेले आहे. 

त्यामध्ये  महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी व आय.पी.एस. अनंत ताकवले, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड,  पंढरपूरचे माजी पोलीस उपविभागीय अधिकारी व आय.पी.एस. निखील पिंगळे, सध्या झारखंड येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे बार्शीचे रमेश घोलप, एम.पी.एस.सी. परीक्षेमध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम आलेले श्रीकांतजी गायकवाड, पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले, पंढरपूरचे सध्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे साहेब, जिल्हा कोषागार अधिकारी, सोलापूर सूर्यकांत खटके, तसेच यू.पी.एस.सी. उत्तीर्ण होऊन आय.बी. मध्ये सिलेक्शन झालेले आसिफ यत्नाळ यांचा समावेश आहे.

आज झालेल्या वेबिनार मध्ये स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात प्रश्न विचारले.  या प्रश्नांची उत्तरे त्रिपुरा प्रशासनामध्ये सचिव पदी असणारे व मूळचे परभणी जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावातील असणारे आय. ए. एस. अधिकारी  सुधाकर शिंदे यांनी दिली. तसेच यू.पी.एस.सी सह सर्व स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे  ते म्हणाले की, ' विद्यार्थ्यांनी मातृभाषा, हिंदी तसेच इंग्रजी भाषेवर देखील प्रभुत्व संपादन केले पाहिजे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा तर सोप्या होतातच शिवाय कार्यालयीन कामकाज  देखील सोपे होते. विद्यार्थ्यांनी सहावी ते बारावी पर्यंतची NCERT ची विविध विषयांची पुस्तके अभ्यासावी तसेच त्यातील बहुपर्यायी प्रश्न देखील सोडवावेत आणि त्यासोबत लिखाणावर आणि उत्तरांच्या योग्य मांडणीवर भर द्यावा.' स्वेरीच्या प्रशांत माळी व कौशिक कुलकर्णी या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते पुढे म्हणाले की,  'सध्या पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी वर्तमान पत्रांचे नियमितपणे वाचन केले पाहिजे व आपले सामान्य ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे व लिखाणावर भर दिला पाहिजे तसेच इंग्रजीतून संभाषण करण्यावर देखील भर देणे आवश्यक आहे.' पुढे या वेबिनारमध्ये यू.पी.एस.सी पूर्वपरीक्षा २०२० च्या 'भूगोल' या विषयाशी संबंधित १०० प्रश्नांची व त्यांच्या उत्तरांची चर्चा कुकान विस्डम ॲकॅडमी चे संचालक निखील नानगुडे यांनी केली व शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले.