पंढरीतील सुप्रसिध्द व्यापारी संतोष त्रिंबक भिंगे यांचे निधन... दिलखुलास स्वभावाचा संवेदनशील पंढरपूरकर काळाच्या पडद्याआड

Pandharpur Live-  
पंढरपूर येथील सुप्रसिध्द संतोष त्रिंबक भिंगे (वय 47) यांचे आज अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. गेल्या अनेक दिवसापासुन ते कर्करोगामुळे आजारी होते. यातुन ते सावरलेही होते; परंतु दोन दिवसापुर्वी अचानक त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. 

संतोष भिंगे हे एक कुशल व्यापारी तर होतेच परंतु त्यांना सामाजिक कार्याचीही आवड होती. समाजातील अनेक सज्जनांचा सत्कार करतानाच समाजातील वाईट घटनांवर ते रोखठोकपणे व्यक्त होत असत. मागील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी आम आदमी पार्टीकडून नगरपरिषदेची निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत त्यांच्या लक्षवेधी प्रचाराची सर्वत्र चर्चा झाली होती. भिंगे किराणा दुकान, भिंगे साडी सेंटर, भिंगे मिसळ आदी फर्मचे ते संचालक होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. 

फेसबुक, व्हाटसअप अशा सोशल मिडीयाद्वारे ते नेहमीच आपले परखड विचार व्यक्त करत असत. त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. त्यांच्या आकस्मीक निधनामुळे त्यांच्या मित्रपरिवारावर कोसळलेल्या दु:खात पंढरपूर लाईव्ह परिवार सहभागी आहे. संतोष भिंगे यांच्या रुपाने एक सहृदयी माणुस, एक रोखठोक समाजसेवक आणि एक दिलखुलास स्वभावाचा संवेदनशील पंढरपूरकर काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पंढरपूर लाईव्हकडून त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली