महाराष्ट्रात ऑनलाईन मद्य विक्रीस परवानगी ची मागणी... 'सीआयएबीसी' नं मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली मागणी


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- करोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. लोकांनी घरातच राहावं याची खबरदारी घेण्यासाठी केंद्र सरकारनं अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता सर्व गोष्टी बंद केल्या आहेत. त्यामुळे इतर सर्वच क्षेत्रातील उद्योग आणि सेवा कोलमडल्या आहेत. यात मद्य उत्पादक क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सीआयएबीसी (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेवरेज कंपनीज् ) या संघटनेनं महाराष्ट्रात ऑनलाईन मद्य विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात संघटनेनं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे.
'महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे.

त्यामुळे सरकार मद्य विक्रीची दुकान खुली करू शकत नसेल, तर सरकारनं कमीत कमी ऑनलाईन मद्य विक्रीस परवानगी द्यावी. त्यामाध्यमातून घरपोच डिलिव्हरी करता येईल. त्यामाध्यमातून रोजगाराबरोबरच कर संकलन होण्यास सुरूवात होईल. यासंदर्भात संघटनेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. यात मेघालय आणि पश्चिम बंगालमध्ये ऑनलाईन डिलिव्हरी पद्धतीनं मद्य विक्री सुरू करण्यात आली असल्याचंही सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे,' असं 'सीआयएबीसी'चे महासंचालक विनोद गिरी यांनी 'मनी कंट्रोल'शी बोलताना सांगितलं.

'मद्य विक्रीच्या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. राज्य सरकारच्या उत्पन्नाचा हा महत्त्वाचा स्त्रोत आहे. त्याचबरोबर आज करोनासारख्या परिस्थितीला निपटण्यासाठी सरकारला निधीची गरज पडणार आहे. दारु विक्री बंद असल्यानं मद्य उत्पादक कंपन्यांबरोबरच राज्य सरकारचही नुकसान होत आहे,' असंही सीआयएबीसी'नं मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

केंद्र सरकारलाही पत्र
सीआयएबीसी'नं केंद्र सरकारचंही या मुद्याकडं लक्ष वेधलं आहे. यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र देण्यात आलं आहे. त्याचबरोबर देशातील इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही संघटनेनं पत्र पाठवलं आहे. हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाण वगळता इतरत्र ऑनलाईन विक्री सुरू करावी. सोशल डिस्टन्स राखले जावे म्हणून होम डिलिव्हरीची सुविधा करता येईल. त्याचबरोबर टप्प्याटप्यानं मद्य विक्रीची दुकानं सुरू करण्यात यावी, असं संघटनेनं म्हटलं आहे.