टाळ-मृदंगाच्या निनादात जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांचं प्रस्थान... यंदा सुना सुना भासला इंद्रायणीचा घाट....




Pandharpur Live -
पुणे : कोरोनाच्या संकटामुळे यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या सावटाखाली जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांचा 335 वा पालखी प्रस्थान सोहळा साजरा होत आहे.  सर्व परंपरांचे पालन करुन खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह तहसिलदार आणि मानाच्या 50 वारकर्‍यांच्या उपस्थितीत या सोहळ्याला सुरुवात झाली. 

सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं पालन करत वारकर्‍यांनी टाळ मृदुंगाच्या निनादात विठुनामाचा गजर केला. याचबरोबर आज संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचंही प्रस्थान विठुनामाच्या गजरात झालं.  

मोजक्याच वारकर्‍यांसोबत ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने अवघी देहूनगरी दुमदुमली. मोजकेच वारकरी वारकरी सांप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेत, वारीची ही दैदिप्यमान परंपरा जपताना दिसत आहेत. दरवर्षी इंद्रायणीचा काठ हा लाखो वारकर्‍यांनी गजबलेला असतो. इंद्रायणीत स्नान करत विठूनामाच्या जयघोषात तल्लीन होत असतात. पण वारकर्‍यांनी गजबलेला इंद्रायणीचा घाट मात्र यंदा खुपच सुना सुना भासत होता आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

कोरोनाच्या सावटामुळे पायी वारी सोहळा होणार नसल्यानं वारकर्‍यांच्या मनात दुःख आहे. मात्र, वारकरी संप्रदाय हा कायम विवेकाची कास जोपासत आला आहे. त्यामुळं यंदा सगुण वारकरी करण्याऐवजी वारकर्‍यांनी निर्गुण वारी करत एक झाड लावून पर्यावरण रक्षण करावं, असं आवाहन सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी केलं आहे.
कोरोनाच्या सावटाखाली होणार्‍या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज देहूमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देहू गावच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. देहूमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. संत तुकाराम महाराज मंदिर व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. मंदिरात परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येणार नसून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. यंदाच्या वर्षी केवळ परंपरा पाळली जाणार असून, यापूर्वी एक-दोनदा पालखी सोहळ्याची परंपरा खंडित झाली होती, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा

तर संत एकनाथ महाराजांच्या पादुका पालखीचे अध्यात्म नगरी पैठण शहरातून प्रस्थान सोहळा आज पार पडला. कोरोनाच्या सावटाखाली मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत पालखीचे प्रस्थान झाले. दरवर्षी पालखी प्रस्थान सोहळ्याला लाखो भाविकांची उपस्थिती असते.

एकनाथ महाराजांची पालखी समाधी मंदिरात विसावली. या मंदिरात पुढील 18 दिवस पालखीचा मुक्काम राहणार आहे. त्यानंतर आषाढी एकादशीला मोजकेच मानकरी वाहनाने नाथांच्या पादुका पंढरपूरला रवाना होणार आहे.

उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळा
                 दरम्यान उद्या (13 जून) ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यास आळंदीतून पालखी प्रस्थान होईल. मंदिरातून पादुकांचं पालखीतून प्रस्थान होणार आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी माऊलींच्या आजोळ घरी जाईल. या सोहळ्यास मंदिर परिसरात केवळ 50 वारकर्‍यांची उपस्थिती बंधनकारक असेल. यानंतर दशमीला पुढील निर्णयानुसार पालखी पंढरपूरला प्रस्थान करेल.

Post a Comment

0 Comments