चिंताजनक... कोविड सेंटरमधील महिला पेशंटच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह? पुण्यात क्वारंटाईन केंद्रात सुरक्षारक्षकानेच केला महिलेचा विनयभंग

 
पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
 
कोविड सेंटरमधील महिला पेशंटच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. क्वारंटाईन सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या एका सुरक्षा रक्षकानेच विलगीकरण कक्षातील एका महिलेचा विनयभंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. 
 
कोरोनाने सध्या सर्वांना हैराण केलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर किंवा लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीला क्वारंटाईन केंद्रात ठेवलं जातं. कारण त्या व्यक्तिपासून इतर कोणाला धोका नको याची दक्षता म्हणून त्यांना क्वारंटाईन केंद्रात ठेवतात.  पुण्यात सिंहगड रोड परिसरात असेच एक क्वारंटाईन केंद्र आहे. या ठिकाणी महिलांनाही क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूकही करण्यात आली. मात्र, सध्या या क्वारंटाईन केंद्रातील महिला कक्षात ही महिला एकटीच उपचार घेत होती. याचाच फायदा घेऊन महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकानेच या महिलेचा विनयभंग केला. लोकेश मते असं त्या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे.

सुरक्षारक्षकाने या महिलेला वारंवार मिस्ड कॉल, अश्लील फोन-मेसेजस करुन मानसिक त्रास दिला. तसेच रात्रभर खोलीचा दरवाजाही ठोठावल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे.

संबंधित महिलेनं घाबरून 100 नंबरवर कॉल करून तक्रारही केली पण पोलिसांकडे पीपीई कीट नसल्याने त्यांनी कोविड सेंटरमध्ये येण्यास असमर्थता दर्शवली. नातेवाईकांनी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर या महिलेची दुसऱ्या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. 

या घटनेमुळे क्वारंटाईन सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


Post a Comment

0 Comments