Pandharpur Live-
पुणे, प्रतिनिधी: आषाढी एकादशीस शासनाने रायगडाहून पायी चालत आलेल्या शिवरायांच्या पादुकांना विठुरायाच्या दर्शनास पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश करु दिला नाही. पंढरपुरात तर सोडाच पण आता दुर्ग रायगडही चढू दिला नाही.
आता शिवछत्रपती पंढरपुरात सन्मानाने जाऊन विठुरायाशी आपले अंतरीचे हितगुज सांगून मगच राजधानी रायगड चढतील आणि तोपावेतो आम्हीं शिवभक्त आत्मक्लेश म्हणून कठोर उपवास करणार असल्याची स्पष्टोक्ती शिवरायांच्या पालखीतील हुजरे संदीप महिंद यांनी केली.
Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019
टाळेबंदी घोषित होताच लगेचच २८ मार्चपासून २९ जूनपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, २ माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, विद्यमान राज्य मंत्रीमंडळातील ९ मंत्री, १३ खासदार, ३१ आमदार तसेच विविध शासकीय अधिकाऱ्यांसह ७५-८० लोकांच्या भेटी; वेगवेगळे ११७ पत्रव्यवहार करुनही शिवछत्रपतींच्या पालखीविषयी अनास्था दाखविणाऱ्या या शासनाचा व पुढाऱ्यांचा निषेध करून रायगड ते पंढरपुर पायी चालत गेलेल्या शिवभक्तांनी आत्मक्लेश म्हणून भूगाव, (ता. मुळशी, जि. पुणे) ग्रामपंचायतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्तीस्मारकासमोर उपोषण करत आहोत. असे मत आज दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना संदीप महिंद यांनी व्यक्त केले.
शिवरायांच्या पादुकांना सन्मानाने व अतीव आदराने पंढरीत नेऊन नगरप्रदक्षिणेसह सर्व प्रथा-परंपरा पाळून मगच विठुरायाच्या मंदिरात न्याव्या लागतील. भूवैकुंठीचे आराध्य भगवान पांडुरंगाच्या दर्शनभेटीशिवाय कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज रायगडी जाणारच नाहीत. आणि जोपर्यंत शिवछत्रपती राजधानी रायगड चढत नाहीत, तोपर्यंत आम्हीही आमचा आत्मक्लेश उपवास थांबवणार नसल्याचा इशारा श्री. महिंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज दिला.
शासनाशी असलेला हा संघर्ष केवळ वैचारिक व सैद्धांतिक पातळीवरील असून प्रचलित घाणेरड्या राजकारणाशी त्याचा कसलाही संबंध जोडू नये, अशी विनंतीही त्यांनी याप्रसंगी सगळ्याच प्रसिद्धी माध्यमांना व महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना केली.
कालपासून ही सर्व मुले ऊन, वारा, पावसात आपली सश्रद्ध निष्ठा शिवरायांच्या चरणी अर्पण करण्याचा अट्टाहास व आग्रह प्रामाणिकपणे करत आहेत. शिवभक्तांच्या या शिवबा-विठोबा भेटीच्या आग्रहाच्या मागणीस समजून घेण्यासाठी मुळशी तालुक्याचे तहसिलदार अभय चव्हाण आज भेटायला गेले. या सगळ्यांची चौकशी करुन प्रशासनास व वरिष्ठांना याविषयात सगळा निरोप पोहचवून योग्य मध्यस्थी करुन शिवरायांची ज्वलंत अस्मिता व सन्मान जपणारा तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.


