वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ||
निर्वीघ्नम कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
माझे गुरुवर्य श्री. स्वामी सागरानंद सरस्वती तसेच वेदशास्त्रसंपन्न श्री .बाळकृष्ण भानुदास देव यांच्या स्मरणाने या लेखास सुरुवात करतो.
भाद्रपद महिना म्हणजे विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचा जन्मदिवस. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला म्हणून या तिथीचे महात्म्य खूप मोठे आहे. गणपती बाप्पाच्या स्मरणार्थ हा दिवस लोक भक्तिभावानं, उत्साहानं साजरा करतात. सृष्टीच्या निर्मितीच्या आधी पंच देव शंकर, विष्णू, सूर्य गणपती, देवी यांनी मयूर क्षेत्रात श्री गजाननाची मूर्ती स्थापन केली. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला गणेश अवतार झाला म्हणून प्रतिवर्षी मृण्मय गणेश मूर्ती करून तिची यथाविधी स्थापना करून भाद्रपदातील चतुर्थी व्रत करावे. मध्यान्न समयी पूजन करून चतुर्थीस उपोषण करून पंचमीस गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. असे केले म्हणजे सर्व कर्म सफल होतात, पुण्यप्राप्ती होते असा उल्लेख मुद्गल पुराणात आढळतो.
श्रीगणेशाला नरदेह असूनही त्याचे मुख हत्तीसारखे का आहे? याबद्दलच्या कथा पुराणात येतात. शास्त्रानुसार गणेश व्रताचा कालावधी फक्त एक दिवसाचाच असतो. परंतु गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यामुळे हा कालावधी 1 दिवस, 1/2 दिवस, 3, 5, 7, 10, दिवसांपर्यंत आपापल्या पद्धतीनुसार किंवा परंपरेनुसार प्रत्येक जण गणेश उत्सव साजरा करतात.
गणेश मुर्ती मध्यम आकाराची आणावी म्हणजे आपल्या देवघरात ती व्यवस्थित बसू शकते. गणपती बसवल्यानंतर रोज सकाळ, संध्याकाळ पूजा, नैवेद्य, आरती नित्यनियमाने करावी. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा. हल्ली गणपतीची दरवर्षी धातूची अथवा शाडूच्या मातीची गणेश मूर्ती घ्यावी जेणेकरून पर्यावरणाचे नुकसान होणार नाही. नदी-नाल्यांचे समुद्राचे पाणी दूषित होणार नाही. तसेच पर्यावरणाचे महत्त्व आपल्या मुलांना समजावून सांगावे व एक गाव एक गणपती यासारखी योजना पुढे करून हळूहळू गोरगरीब, अनाथ, शेतकरी बांधव, शिक्षणापासून वंचित असलेल्यांना मदत तसेच वृक्षारोपण यांसारखे कार्य गणेश मंडळांनी हाती घ्यावे हीच खर्या अर्थाने गणपती बाप्पाला आपल्या सर्वांकडून जन्मदिवसाची भेट असेल.
या वर्षी शनिवार दिनांक 22/08/2020 रोजी गणेश चतुर्थी आहे. प्रातः कालापासून ते मध्यान्ना पर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते.
गणपती बाप्पा मोरया!
- वे.डॉ. श्री. पंकज पद्माकर घेवारे (शास्त्रीजी) त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालय, पाचोरे गल्ली, गावठा, सिन्नर मोबा.9822679862
जनहितार्थ-या वर्षी गणेशोत्सव साजरा करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश भक्तांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. ही नम्र विनंती.- मुख्य संपादक, पंढरपूर Live



0 Comments