पंढरपूर- मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चरणुकाका पाटील व स्वेरीतील माजी कार्यालयीन अधीक्षक सुर्यकांत कदम यांचे दु:खद निधन झाले. त्यामुळे स्वेरीमध्ये त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दोन मिनिटे मौन बाळगून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
‘पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात अत्यंत तळमळीने काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून कै.चरणुकाका पाटील यांची ओळख आहे. आदरणीय कै.चरणुकाका वर्षातून साधारण दोन-तीन वेळा स्वेरीला भेट देत असत. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी आणि प्रगतीविषयी चर्चा व्हायची. काकांच्या माध्यमातून दरवर्षी चार ते पाच विद्यार्थी स्वेरीमध्ये प्रवेश घ्यायचे. मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम करताना त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे ते कार्य आणि योगदान विसरणे अशक्य आहे. स्वभावाने निर्मळ आणि कोणत्याही विषयाला हात घालताना ते त्या विषयाची सविस्तर माहिती घेत असत आणि मगच त्यावर मत मांडत असत. असे एक वेगळे व्यक्तिमत्व असलेच्या चरणुकाका यांच्या जाण्याने आपले एक आदर्श पालकत्व हरवले आहे व खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांना झालेल्या दु:खात स्वेरी सहभागी आहे.’ असे मत स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी व्यक्त केले. तर ‘स्वेरी परिवाराचे एक घटक व माजी कार्यालयीन अधीक्षक असलेले सूर्यकांत कदम यांनी जवळपास एक तप म्हणजे बारा वर्षे स्वेरीत सेवा केली. कामे कशी करायची, याचे ते सर्वोत्तम उदाहरण होते. प्रामाणिकपणा आणि दिलेला शब्द कसा पाळायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. नम्र स्वभावामुळे स्वेरीच्या वाटचालीत आलेल्या यशात त्यांचा वाटा न विसरण्यासारखा आहे. स्वेरी कॅम्पस मधील काम असो किंवा कॅम्पसच्या बाहेरील काम असो अथवा प्रशासकीय काम असो किंवा खाजगी कामे असो, प्रत्येक काम ते अत्यंत प्रामाणिकपणे करायचे. तलाठी ऑफिस पासून ते मंत्रालयपर्यंतची सर्व कामे ते अगदी विश्वासाने करायचे. एकदा त्यांच्यावर एखादे काम सोपवले की कदम सर ते काम पूर्णत्वास नेणारच असा विश्वास सर्वजण बाळगून होते. त्यामुळे स्वेरी परिवार कदम सरांचे योगदान कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्या कुटुंबियांना झालेल्या दु:खात स्वेरी परिवार सहभागी आहे.’ असे मत स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी व्यक्त केले. यावेळी गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे, समाजसेवक महावीर आवारे, स्वेरीचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस चे इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, स्वेरी संचलित इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
छायाचित्र- मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन कै. चरणुकाका पाटील व स्वेरीचे माजी कार्यालयीन अधीक्षक कै.सुर्यकांत कदम यांना स्वेरीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे, समाजसेवक महावीर आवारे, स्वेरीचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, प्राध्यापक वर्ग व इतर.


0 Comments