पितृपक्षांत नियमितपणे सर्व धार्मिक विधी व व्यवहार करावे - पंकज शास्त्री

सिन्नर प्रतिनिधी :

🌷श्रद्धया क्रियते इतिश्राद्धम🌷

माझे गुरुवर्य स्वामी सागरानंद सरस्वती महाराज तसेच वेदशास्त्रसंपन्न श्री. बाळकृष्ण भानुदास देव (गुरुजी) यांना स्मरण करून या लेखाला सुरुवात करतो. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेलं कर्म. श्राद्धाचे एकूण ९६ प्रकार आहेत. परंतु सर्वसामान्यांना या विषयाचे ज्ञान नसते. त्यामुळे सर्वात प्रचलित असलेले भाद्रपद महिन्यातील प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत श्रद्धेने केले जाणारे महालय श्राद्ध हे सर्वांना परिचित आहे. भाद्रपद शुद्ध पौर्णिमा यादिवशी पितामहाच्या नंतरचे जे तीन पुरुष असतात त्यांना उद्देशून श्राद्ध करावे असे निर्णयसिंधु ग्रंथामध्ये आहे. या जन्मात अथवा पूर्व जन्मामध्ये माझे मित्र बांधव ज्यांनी माझ्यावर खूप उपकार केलेत या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या जीवात्म्याच्या मुक्ती करिता मी पिंडदान करत आहे. या उदार उदात्त भारतीय संस्कृतीच्या ऋषिमुनींनी मानवी जीवनाच्या कल्याणाकरिता या सर्व गोष्टींचा श्राद्धकर्म यामध्ये समावेश केलेला आहे. प्रत्येक पुत्राने आई वडील हयात असताना त्यांच्या आज्ञेचे पालन करणे, वृद्धावस्थेत त्यांचा सांभाळ करणे आणि ते दिवंगत झाल्यावर त्यांच्या पुण्यदिनी प्रतिवर्षी श्राद्ध केल्याने त्या पुत्राची सिद्धता होते. तसेच सध्याच्या काळात आपत्कालीन प्रकारांमध्ये  चट श्राद्ध, आम श्राद्ध (शिधा देणे), हिरण्य श्राद्ध, ब्रह्मारपण श्राद्ध, केवल पिंडदान तसेच हे सर्व न जमल्यास गोरगरीबांना भोजन, अंध अपंग, मूकबधिर यांना आवश्यक ती मदत, पशु पक्ष्यांना धान्य, गाईला घास, मुंग्यांना साखर, पीठ, पाण्यातील माशांना अन्न देणे, तसेच मृत पावलेल्या व्यक्तींच्या प्रित्यर्थ वृक्षारोपण करणे. जमल्यास श्राद्धविधी वाचणे. हे केले तरीही श्राद्धाचे फल मिळते. चतुर्दशीचे महालय श्राद्ध द्वादशी किंवा अमावस्येला करावे.  पौर्णिमेचे महालय श्राद्ध पंचमी, अष्टमी, दशमी, द्वादशी अमावस्येला करावे. श्राद्धाला व्यापिनी तिथी घ्यावी. आजकाल या विज्ञानाच्या युगामध्ये सुशिक्षित लोकं श्राद्धविधीला पितरांच्या पूजनाला अंधश्रद्धा समजतात. परंतु केवळ हिंदु धर्मातच पूर्वजांचे पूजन केले जाते असे नाही. जैन, पारशी, मुस्लिम, तसेच ख्रिस्ती धर्मात देखील पूर्वजांच्या पूजनाला महत्त्व आहे. या पृथ्वीवरील सूक्ष्मातील सूक्ष्म जीव, जंतू, वृक्ष, वेली, पानं, फुलं, फळं, पशु, पक्षी या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही शिकवण भारताने संपूर्ण जगाला दिली. 

*तसेच आपल्या मारवाडी समाजातील लोक तर नित्यनियमाने पंचमहायज्ञ आवर्जून करतात. तसा तो प्रत्येक हिंदूंनी दररोज केला पाहिजे कावळ्याला नैवेद्य, गायीला नैवेद्य, कुत्र्याला नैवेद्य, मुंग्यांना नैवेद्य, अग्नीला नेवैद्य हे केले तरीही पितृदोष नाहीसा होतो. गया श्राद्ध, ब्राह्मणांना तसेच गरिबांना भोजन हे पितृदोष परीहाराचे अत्यंत प्रभावी उपाय आहे हे माझे मत आहे. भरणी श्राद्ध हे एक वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजे वर्षश्राद्ध झाल्यावर येणाऱ्या पितृपक्षात करावे. वडील हयात (जिवंत) असेपर्यंतच अविधवा नवमी श्राद्ध करावे. तसेच आज-काल अनेक लोकं पितृपक्षा मध्ये पितरांसाठी श्राद्धकर्म करावी असे सांगतात. तर काही लोक अंधश्रद्धा म्हणून पितृपक्षात नवीन कामे, नवीन व्यवहार, नवीन वाहन घेणे, शेतीची कामे करू नयेत असे सुचवतात. परंतु श्राद्धकर्म करणे म्हणजे अशुभ मानणे चुकीचे आहे. पितृपक्षात सुद्धा ही सर्व कामे करता येतात. 

पितृपक्षात पक्ष श्राद्ध करणे शक्य झाले नाही तर पुढे महालय समाप्ती पर्यंत कोणत्याही दिवशी पक्ष श्राद्ध करता येते. यावेळेस अधिक अश्विन मास वर्ज्य करून दिनांक १५ नोव्हेंबर २०२० रोजी महालय समाप्ती पर्यंत पितृपक्षातील महालय श्राद्ध करता येईल.       
    
 डॉ. वे. शा. सं. श्री. पंकज पद्माकर घेवारे. (शास्त्रीजी)
त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालय, पाचोरे लेन, गाळा नंबर 3,5,  गावठा, सिन्नर ता. सिन्नर जि. नासिक
मो. 9822679862

पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977

Post a Comment

0 Comments