पंढरपूर– ‘विद्यार्थ्यांनी करिअर करताना आपली आवड-निवड बाजूला ठेवून ज्या क्षेत्रामध्ये उत्तम करिअर घडविता येऊ शकते त्या क्षेत्रात आवड निर्माण करण्याची गरज आहे. भविष्य उत्तम आहे पण आवड नाही, अशा परिस्थितीत आपल्याला मानसिकता व आवड बदलावी लागते. आपण प्रवेश घेत असलेल्या महाविद्यालयाची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे. करिअर करताना पारंपारिक अभ्यासक्रमात कमी संधी असतात तर व्यावसायिक शिक्षणात करिअर करण्याच्या संधी अधिक प्रमाणात असतात. शिक्षण घेण्यासाठी शासनाने शैक्षणिक कर्जाची सोय केलेली असते याची बऱ्याचदा आपल्याला माहिती नसते तरी त्याबद्दलही विद्यार्थी व पालकांनी माहिती घ्यावी.’ असे प्रतिपादन श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले.
स्वेरीच्या वतीने ‘बारावीनंतर पुढे काय? या महत्वाच्या विषयावर फेसबुक लाईव्हद्वारे डॉ. रोंगे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. प्रास्ताविकात प्रा. यशपाल खेडकर यांनी स्वेरीची व डॉ. रोंगे सरांची ओळख करून देत मिळालेली मानांकने, संशोधने, कमवा व शिका योजना आदी बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच डॉ. रोंगे सरांची खर्डीपासून ते पीएच.डी. पर्यंतची शैक्षणिक वाटचाल सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेली संशोधने व वर्तमान परिस्थितीची माहिती दिली. पुढे बोलताना शिक्षणतज्ञ डॉ. रोंगे म्हणाले की, ‘शिक्षण क्षेत्रात प्रामुख्याने पारंपारिक व व्यावसायिक शिक्षण असे दोन प्रकारचे शिक्षण असून पारंपारिक अभ्यासक्रमात आर्ट्स, कॉमर्स व सायन्स या तीन शाखा पर्याय म्हणून निवडल्या जातात तर व्यावसायिक शिक्षणामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, सीए, सीएस, आर्किटेक्चर इ. पर्याय उपलब्ध आहेत. पारंपरिक शिक्षणाच्या आधारे स्पर्धा परीक्षा देवून देखील यश खेचून आणता येते परंतु त्यात जागांची संख्या कमी असते आणि स्पर्धक खूप असतात. खर्डीतील राहुल चव्हाण यांनी पारंपारिक शिक्षण घेऊन देखील यूपीएससीमध्ये यश मिळविले पण असे विद्यार्थी अपवाद असतात. इंजिनिअरिंगकडे पाहिल्यास प्रवेश क्षमता, शैक्षणिक पात्रता आणि आता त्यात नव्याने झालेले बदल यामुळे व्यावसायिक शिक्षण सोयीचे झालेले आहे.’ असे सांगून डॉ. रोंगे यांनी इंजिनिअरिंग कॉलेज निवडताना विद्यार्थी आणि पालकांनी ‘नेमके काय पहावे आणि काय पाहू नये ?’ हे सांगताना त्यांनी ‘फसव्या जाहिराती पाहू नयेत, जाहिरातींमधील सत्यता पडताळून पहावी, कोणते विद्यापीठ आहे याला महत्त्व नाही त्याचबरोबर कॉलेजची फी पाहू नये' असे सांगितले. योग्य कॉलेज निवडताना त्या कॉलेजचे कल्चर, शिक्षकांची गुणवत्ता, रिझल्टची परंपरा, इन्फ्रास्ट्रक्चर, प्लेसमेंट, संशोधन आणि त्यासाठी आलेला निधी, सेक्युरिटी व सेफ्टी, कॉलेजला मिळालेली मानांकने याचाही विचार करावा. अंधविश्वास न ठेवता या सर्व बाबींची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा आयडी व पासवर्ड कोणालाही देऊ नये. विद्यार्थ्यांनी नेहमी ‘पुस्तक आणि मित्र’ हे पडताळून पाहावेत.’ असाही कानमंत्र त्यांनी यावेळी दिला. ‘शैक्षणिक कर्ज’ मिळवण्यासाठी मार्जिन मनी, थकीत बिल, नातेवाईकांचे थकीत बिल पाहिले जात नाही, जमीन किती आहे हे पहिले जात नाही. शिक्षण शुल्क, वसतिगृह, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य यासाठी बँक शैक्षणिक कर्ज देत असते.' असे सांगून कोविड-१९ मुळे सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. असे सांगून शासनाच्या परिपत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठलाही विलंब होत नसेल तर लवकरच महाविद्यालये नियमित सुरू होतील. हे देखील स्पष्ट केले. तसेच सोशल डिस्टन्स राखून मास्क व सॅनिटायझर याचा वारंवार वापर करण्याचे आवाहन केले. तसेच यावेळी अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे, प्रमाणपत्रे याबद्दल सविस्तर माहिती दिली. स्वेरीने ‘फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमाचे आयोजन करून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महत्वाची माहिती दिल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाले. आतापर्यंत हे फेसबुक लाईव्ह सत्र जवळपास पन्नास हजार व्यक्तींपर्यंत पोहोचले आहे.
0 Comments