लॉकडाऊनची आता गरज आता नाही....त्यामुळे राज्यांनी शक्यतो लॉकडाऊन लागू करू नये! पंतप्रधान नरेंद्र मोदी


 Pandharpur Live Online:

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असला तरी आता त्याविरुद्ध लढण्यासाठी अपेक्षित बुद्धिमत्ता, ज्ञान आणि क्षमताही आपण प्राप्‍त केलेली आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळात होती, तशी लॉकडाऊनची गरज आता नाही. त्यामुळे राज्यांनी शक्यतो लॉकडाऊन लागू करू नये. अगदीच टोकाला परिस्थिती गेली तरच असा निर्णय घेतला जावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. मोठ्या शहरांतून मजुरांचे पलायन होऊ नये म्हणून त्या-त्या राज्य सरकारांनी मजुरांना विश्‍वास देण्याचे काम करायला हवे, अशी अपेक्षाही पंतप्रधानांनी व्यक्‍त केली.

कोरोनावरील उपचार आणि औषधांपासून ते शासकीय पातळीवर सर्व प्रकारच्या प्रयत्नांचा आणि निर्णयांचा आढावा त्यांनी घेतला.

ऑक्सिजनची टंचाई रुग्णांना भासू नये म्हणून केंद्राने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. अठरा वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यासाठीच्या पूर्वतयारीचाही थोडक्यात आढावा पंतप्रधानांनी घेतला.

दुसरी लाट आल्याने देशातील परिस्थिती बिघडल्याचे मोदींनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. ज्यांनी आपले आप्‍त या महामारीत गमावलेले आहेत, त्यांच्या दु:खाची मला जाणीव आहे. मी कुटुंबातील एक सदस्य म्हणून या दु:खात सहभागी आहे. आपल्या समोर या महामारीने मोठे आव्हान उभे केले आहे, पण आपल्याला मिळून तिचा मुकाबला करायचा आहे, असे ते म्हणाले.

राम म्हणजे मर्यादा, रमजान म्हणजे संयम

आताच आपण रामनवमी साजरी केली. पुरुषोत्तम राम हे मर्यादेचे प्रतीक आहे. सध्या रमजान महिन्याचे पवित्र पर्वही सुरू आहे. रमजान आम्हाला संयमाची शिकवण देतो. कोरोनाच्या या काळात आपण रामाची मर्यादा आणि रमजानचा संयम पाळण्याची गरज आहे. विनाकारण घराबाहेर पडणे सर्वांनीच टाळायला हवे. मुलांनी आपल्या घरातील मोठ्यांना तसे करण्यापासून रोखावे, असे आवाहन बालमित्रांना उद्देशून पंतप्रधानांनी केले.

Post a Comment

0 Comments