स्व.सुधाकरपंत हे निष्काम कर्मयोगी होतेः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस; प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

 


पंढरपूर - स्व. सुधाकरपंत परिचारक यांना जरी लोक प्रेमाने मालक म्हणून संबोधत होते मात्र त्यांनी कधीची मालकाप्रमाणे न वागता जनतेचा सेवक म्हणूनच काम केले. ते निष्काम कर्मयोगी होते, अशी शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली वाहिली. 

कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कर्मयोगी फाउंडेशनचे उद्घाटन तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हेाते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील व प्रशांत परिचारक यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, नगराध्यक्षा साधना भोसले, युटोपियन कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, आज असा दिवस आहे की मी प्रथम सांगोल्यात कै. भाई गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेलो आणि आता स्व.पंतांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी आलो आहे. स्व. गणपतआबा व पंत हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहेत. आपण त्यांच्यासारखे बनण्याचा अथवा त्यांच्याप्रमाणे माणसे घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुधाकरपंत परिचारक यांना लोक मालक म्हणत मात्र ते कधीच मालकांसारखे वागले नाहीत तर सेवक म्हणून सतत सामान्य माणसांची कामे प्रामाणिकपण करत राहिले. जी कामे त्यांनी केली ती लोकहिताचीच  होती. आज त्यांच्या पश्‍चात त्यांचा विचाराचा वारसा आमदार प्रशांत परिचारक व त्यांचे बंधू उमेश परिचारक  तसेच सहकारी पुढे नेत आहेत. 


दरम्यान याप्रसंगी कर्मयोगी फाउंडेशनचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोहन परिचारक, ऋषीकेश परिचारक, प्रणव परिचारक यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. हे फाउंडेशन शेती व पर्यावरणासह विविध कार्यांसाठी स्थापन करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर सध्या राबविण्यात आले असून वृक्षारोपण ही मोठ्या प्रमाणात केले जात असल्याचे रोहन परिचारक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आजच्या शिबिरात २५० जणांनी रक्तदान केल्याचे रोहन परिचारक म्हणाले.

फडणवीस यांचा अगोदर पंढरपूर दौरा ठरला नव्हता , मात्र ते सांगोल्यात येत असल्याने मंगळवारीच सुधाकरपंत परिचारक यांची पुण्यतिथी असल्याचे त्यांना समजल्यावर ते आवर्जुन येथे आले व त्यांनी आदरांजली वाहिली तसेच कार्यक्रमांना हजेरी लावली व पुढे बार्शीकडे रवाना झाले. याप्रसंगी पांडुरंग परिवारातील अनेक नेते उपस्थित होते. यात दिनकरभाऊ मोरे, वसंतराव देशमुख, दिलीप घाडगे, दिलीप चव्हाण, कैलास खुळे, सुभाष मस्के, दाजी भुसनर, भास्कर कसगावडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. 

.................

........................


Post a Comment

0 Comments