शेतात बोअर घ्यायचाय, दुचाकी घ्यायचीय! आईकडून पैसे आण.... सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने घेतला भयंकर निर्णय...


 
Pandharpur Live Online: शेतात बोअर घ्यायचाय, दुचाकी घ्यायचीय! आईकडून पैसे आण! असा तगादा लावून सासरची मंडळी वारंवार छळत होती! अखेर विवाहितेने या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आपला जीवनप्रवास संपवल्याची ह्रदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलीय.

केज तालुक्यातील नाव्होली येथील २९ वर्षीय विवाहितेने सासरी होणाऱ्या जाचाला कंटाळून राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार (ता. १७) रोजी सायंकाळी घडली. कल्पना दत्तात्रय झाडे असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. बुधवारी सकाळी मृत महिलेच्या नातेवाइकांनी मृतदेह पोलिस ठाण्यात आणून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यावेळी पोलिसांनी आरोपी अटक करण्याचे आश्वासन देत मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून दत्तात्रय झाडे (पती), माणिक झाडे (सासरा) व गोरख झाडे (दीर) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.

तालुक्यातील पिसेगाव येथील सायसराव लांडगे यांची मुलगी कल्पना हिचा विवाह २०१४ मध्ये नाव्होली येथील माणिक झाडे यांचा मुलगा दत्तात्रय ऊर्फ भुजंग झाडे याच्या सोबत झाला होता. कल्पनाला एक चार वर्षांचा मुलगा व एक पाच महिन्याची मुलगी असे दोन अपत्य आहेत. सासरी पती, सासरा व दीर हे सतत कल्पनाला आपल्या शेतात बोअर घेण्यासाठी, नवीन दुचाकी घेण्यासाठी तुझ्या आई-वडिलांकडून पैसे घेऊन येण्याची मागणी करून मारहाण करीत. मानसिक व शारीरिक त्रास देत घराबाहेर काढत होते. सासरी होणाऱ्या जाचाची ती आपल्या आई, वडील व भावाला वेळोवेळी कल्पना देत होती. त्यामुळे माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांची समजूत काढली होती. परंतु सासरी होणारा जाच काही कमी झाला नाही. या सतत सासरी होणाऱ्या जाचास कंटाळून अखेर कल्पनाने मंगळवारी मध्यरात्री आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच माहेरच्या लोकांनी नाव्होली येथे धाव घेतली व मृतदेहाची पाहणी केली. या घटनेसंबंधी घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत मृतदेह केज पोलिस ठाण्यात आणून सासरच्या लोकांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितल्याने मृत महिलेचा भाऊ अंकुश लांडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दत्तात्रय ऊर्फ भुजंग माणिक झाडे (पती), माणिक विठ्ठल झाडे (सासरा), व गोरख ऊर्फ पोपट माणिक झाडे (सर्व रा. नाव्होली, ता. केज) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच आरोपींच्या शोधात असताना मृत महिलेचा पती दत्तात्रय झाडे हा मस्साजोग येथून पळून जाण्यच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. दिरास काळेगावघाट येथून तर सासऱ्यास नाव्होली येथून ताब्यात घेतले.

Post a Comment

0 Comments