Pandharpur Live Online: शो मॅन राज कपूर यांच्या रणधीर, ऋषी आणि राजीव या तीन पुत्रांपैकी ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांचे गेल्या दोन वर्षांत एकापाठोपाठ निधन झालं.
याहू इंडियासाठी लिहिलेल्या एका लेखात रणधीर यांनी राजीव कपूर यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. राजीव यांच्या निधनाच्या आदल्या रात्री दोन्ही भावांमध्ये संवाद झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
त्यांनी लिहिलंय, 'रात्रीचे दोन वाजले होते आणि राजीवच्या खोलीचे दिवे सुरू होते. तो दारू पीत बसला होता. मी त्याच्या खोलीत गेलो. आता पिणं थांबवून जेऊन झोपी जा, असं त्याला सांगितलं आणि मी माझ्या खोलीत निघून गेलो. तो त्याचा आणि माझा शेवटचा संवाद होता. सकाळी नर्स धावतपळत माझ्याजवळ आली आणि राजीवची प्रकृती गंभीर असून त्याचे पल्स कमी होत असल्याचं सांगितलं. आम्ही त्वरित त्याला रूग्णालयात घेऊन गेलो. पण तासाभरातच तो आम्हा सर्वांना सोडून गेला. तो इतक्या लवकर जाईल, असं वाटलं नव्हतं. माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. ऋषीला कॅन्सर होता. तो अमेरिकेत उपचार घेत होता. आम्ही सर्व त्याला भेटून आलो होतो. त्याचं कधीही बरं वाईट होऊ शकतो याची धास्ती होतीच. पण राजीव इतक्या अचानक जाईल, असं आम्हा कुणालाचं वाटलं नव्हतं.'
राजीव यांच्या करिअरबद्दलही रणधीर यांनी खुलासा केला आहे. आयुष्यातील काही वाईट अनुभवांमुळे राजीव त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करू शकला नाही. राजीवचं लग्न केवळ दोन वर्षात मोडलं होतं. त्याच्या आयुष्यात अनेक वाईट प्रसंग आले आणि तो भरकटला. तो आतून दुखावला होता आणि शेवटी त्यानं करिअरवर लक्ष देणंच बंद केलं. तो कपूर कुटुंबातील सर्वात हुशार व प्रतिभावान सदस्य होता. लग्न अपयशी ठरल्यावर त्याच्या अनेक गर्लफ्रेन्ड होत्या. पण त्याने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार बोलून दाखवला नव्हता आणि तुम्ही कुणाला लग्नासाठी बळजबरी करू शकत नाही. तो निराश होता. खूप जास्त व्यसनाच्या आहारी गेला होता. हे व्यसनचं एकदिवस त्याचा बळी घेईल, असं मला वाटलं होतं. पण तो अशाप्रकारे सोडून जाईल, असा विचार मी कधीच केला नव्हता, असेही त्यांनी लिहिले आहे.
राज कपूर यांचे सर्वात लहान पुत्र असलेल्या राजीव कपूर यांनी 1983 मध्ये 'एक जान है हम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'राम तेरी गंगा मैली' हा त्यांचा चित्रपट गाजला होता. त्यानंतर लव्हर बॉय आणि जबरदस्त या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं, पण अभिनय क्षेत्रात ते आपला ठसा उमटवू शकले नाहीत.
0 Comments