Pandharpur Live Online: ज्येष्ठ नाटककार, पत्रकार जयंत पवार यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. दुर्बल वंचितांचे जगणे नाटकातून-साहित्यातून जिवंत करणारा वास्तववादी लेखक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी लिहिलेले गिरणी कामगारांच्या जीवनावरील 'अधांतर' नाटक रंगभूमीवर 'माइलस्टोन' ठरले. या नाटकाने नव्या जाणिवांचा नाटककार ही ओळख त्यांना दिली. जयंत पवार यांच्या निधनाने वर्तमानावर परखड ओरखडे ओढणारा भाष्यकार-मार्गदर्शक हरपला, नवोदित साहित्यिकांचा आधारवड गेला, अशा भावना पत्रकारिता आणि नाटय़क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

मागील काही वर्षांपासून जयंत पवार आजारी होते. पवार यांना शनिवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 61 वर्षांचे होते. त्यांच्यावर बोरिवली पूर्व येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी पत्रकार- लेखिका संध्या नरे-पवार, मुलगी असा परिवार आहे.

गिरणगावात राहिलेल्या जयंत पवार यांच्या नाटकाचे आणि एकांकिकेचे विषय, वातावरण आणि संबंध कामगार विश्वाशी होते. सामान्य गिरणगावकर ते एक संवेदनशील लेखक असा त्यांचा प्रवास आहे. त्यांनी लेखनातून महानगरांच्या प्रश्नांना वाचा पह्डली. माणसांची मूळ हरवणं, त्यांचे स्थलांतर, विस्थापित, निर्वासित होणे, हतबलता, अगतिकता हे त्यांच्या नाटकांचे कळीचे मुद्दे राहिले.

पवार यांच्या 'अधांतर' नाटकाला राम गणेश गडकरी महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन ललित साहित्य गौरव नाटय़दर्पण, जयवंत दळवी स्मृती नाटय़लेखन पुरस्कार असे अनेक लेखन पुरस्कार मिळाले आहेत. 'अधांतर' नाटकाचे हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद झाले आहेत. तसेच त्यावर 'लालबाग परळ' हा मराठी चित्रपट आला. 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहाला 2012 सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. पवार यांनी विद्रोही साहित्य संमेलन आणि 15 व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले.
जयंत पवार यांनी लिहिलेली नाटके
z अधांतर z काय डेंजर वारा सुटलाय z टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक)
z दरवेशी (एकांकिका) z पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप) z फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह) z बहुजन संस्कृतीवाद आणि लेखक (भाषाविषयक) z माझे घर z वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह) z वंश z शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक) z होडय़ा (एकांकिका)
संवेदनशील लेखक, नाटककार गमावला मुख्यमंत्र्यांची आदरांजली
ज्येष्ठ पत्रकार, नाटककार जयंत पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. नाटय़क्षेत्रातील साक्षेपी आणि पत्रकारिता, साहित्य अशा क्षेत्रात निखळ तितकेच संवेदनशील विहार करणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. या क्षेत्राला त्यांची निश्चितच उणीव भासत राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जयंत पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
..................................


0 Comments