यंदाचा ‘आदर्श प्राचार्य पुरस्कार २०२२’ स्वेरीच्या डॉ. एन.डी.मिसाळ यांना जाहीर
मुंबईच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाची घोषणा
पंढरपूर- मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या तर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा ‘आदर्श प्राचार्य पुरस्कार' नुकताच घोषित करण्यात आला असून यंदाचा ‘आदर्श प्राचार्य पुरस्कार २०२२’ हा गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (पॉलिटेक्निक) चे प्राचार्य डॉ. नितिन ज्ञानेश्वर मिसाळ यांना शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय उपक्रम आणि योगदानाबद्दल घोषित झाला आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून समाजातील पत्रकार, शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, उद्योग आदी क्षेत्रातील आदर्श योगदान देणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा गौरव नियमितपणे केला जातो. त्यांच्या निवड समितीने यंदाचा ‘आदर्श प्राचार्य पुरस्कार २०२२’ हा प्राचार्य डॉ. मिसाळ यांना घोषित केला असून हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. ४ जून २०२२ रोजी सायं. ४ वा. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, डॉ. सुरेंद्र गावसकर सभागृह, दादर (पूर्व), मुंबई येथे होणार असून सन्मानचिन्ह व मानाची शाल अशा स्वरूपात हा पुरस्कार प्रमुख अतिथी असलेले आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, सुप्रसिद्ध कवी आणि गझलकार ए.के.शेख आणि जेष्ठ शिक्षणतज्ञ व साहित्यिक डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
समारंभाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर हे लाभले आहेत. संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, प्रमुख कार्यवाह विभव बिरवटकर, संतोष धोत्रे, संयुक्त कार्यवाह किशोर गायकवाड, खजिनदार विजय सावंत, उपाध्यक्ष संजय पाटील, शंकरराव राहणे, प्रमुख सल्लागार संपादक प्रकाश पोहरे, समूह संपादक अभिजित राणे, संपादक डी.एन.शिंदे, संपादक बाळकृष्ण कासार, संपादक शंकर शिंदे आदी संचालक मंडळातील सदस्यांनी डॉ. मिसाळ यांच्या शैक्षणिक कार्यातील उंचावलेला आलेख पाहून ‘आदर्श प्राचार्य पुरस्कार’ म्हणून डॉ. मिसाळ यांचे नाव घोषित केले. प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ हे स्वेरीच्या स्थापनेपासून म्हणजे १९९८ पासून स्वेरीत शैक्षणिक कार्यात झोकून देवून कार्य करत आहेत. सन २००८-०९ साली डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना झाली तेंव्हा संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्राचार्य पदाची धुरा डॉ. एन.डी. मिसाळ यांच्यावर सोपवली आणि येथून खऱ्या अर्थाने हा शैक्षणिक प्रवास सुरु झाला. दरवर्षी यशाची नवी शिखरे पादाक्रांत करत या यशाचा आलेख वरचेवर वाढतच आहे. प्रत्येक वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, वार्षिक परीक्षांचे निकाल, विद्यार्थ्यांसाठीच्या सोयी सुविधा या महत्वाच्या बाबी जिल्ह्यात अग्रेसर असून उपक्रमशील शिक्षक म्हणून जिल्हाभर डॉ. मिसाळ यांची ओळख निर्माण झाली आहे. २०१९ साली डिप्लोमाच्या पाच विभागांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे एनबीए (नॅशनल बोर्ड ऑफ एक्रीडिटेशन) मानांकन मिळाले आहे. तसेच ते इतरही महाविद्यालयांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात. एवढेच नव्हे तर गेल्याच महिन्यात स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकीला देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण असलेले ‘नॅक’ अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल’ चे ३.४६ सीजीपीए सह ‘ए प्लस’ हे मानांकन मिळाले. यात देखील प्राचार्य डॉ. मिसाळ यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी आणि पालक यांच्यात विशेष संकल्पना राबवून प्रत्येक विद्यार्थ्याला करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याचे काम डॉ. मिसाळ सर हे चोखपणे सांभाळतात. ‘आदर्श प्राचार्य पुरस्कार’ घोषित झाल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. मिसाळ यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments