पिंपरी : एक वर्षापूर्वी मित्राचा खून केल्याचा राग मनात धरून नऊ जणांनी मिळून रिक्षाचालकाचा नियोजनबद्ध काटा काढला. ही घटना सोमवारी (दि. 10) दुपारी एकच्या सुमारास रोहकल, चाकण येथे घडली.
युसूफ अर्षद काकर (19, रा. खंडाळा, चाकण) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. प्रणव ऊर्फ पन्या संजय शिंदे (वय 19), आनंद हनुमंत कोरमशेट्टी (वय 19), निशान देवेंद्र बोगाटी (वय 18), कुलदीप संजय जोगदंड (वय 19), अशोक शंकर चव्हाण (वय 32), अजय अंकुश कांबळे (वय 24) यांच्यासह अन्य सहा विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, सहा लोखंडी कोयते, तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 10) दुपारी एकच्या सुमारास अक्षय काचोळे यांनी चाकण पोलिस ठाण्याला फोन करून कळवले, की रोहकल येथील बैलगाडा शर्यतीचे घाटाजवळ एकावर कोयत्याने वार झाले आहेत. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता रिक्षाचालक युसूफ काकर याचा खून झाल्याचे समोर आले. घटनास्थळावर मिळालेल्या रिक्षाच्या क्रमांकावरून पोलिसांनी युसूफचा पत्ता शोधून काढला. तसेच, युसूफची गोपनीय माहिती प्राप्त केली. दरम्यान, सप्टेंबर 2021 मध्ये रोहित प्रभू सहानी (वय 16) याच्या खुनाच्या गुन्ह्यात मृत युसूफ हा सहभागी असल्याचे समोर आले.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सहानीच्या मित्रांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी सहानी याचा जिवलग मित्र निशान बोगाटी याच्याकडे चौकशी करताना त्यांना समजले की, आरोपी प्रणव शिंदे याने साथीदारांच्या मदतीने हा खून केला आहे. त्यानुसार, पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून अन्य आरोपींना ताब्यात घेतले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न जर्हाड, पोलिस अंमलदार विक्रम गायकवाड, संदीप सोनवणे, भैरोबा यादव यांच्या पथकाने केली.




0 Comments