सोलापूर- तुळजापूर मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात ; देवदर्शन घेऊन परत निघालेले दोन युवक जागीच ठार

 सोलापूर : देवीचे दर्शन घेऊन तुळजापूरहून सोलापूरच्या दिशेने येत असताना मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.2) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.


शनिवारी सायंकाळच्या सुमारास एसटीने मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्याने आई व बहिणीला दर्शनासाठी घेऊन जाणारा एक १५ वर्षांचा महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा त्याच रोडवर तळे हिप्परगानजीक मेजरसाब धाब्याच्या समोर भीषण अपघात झाला.

दुचाकी व वाळूवाहतूक हायवा टिपरच्या भीषण अपघातात दुचाकी वरील दोघे युवक जागीच ठार झाले. ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता की दोघे उडून एकमेकापासून दूर-दुर रक्ताच्या थारोळ्यात अस्ताव्यस्त पडले होते. मोटरसायकल दुसरीकडे पडली होती. डोक्याला गंभीर इजा झाली. काळीज हेलावून टाकणारे हे भीषण दृश्य पाहण्याकरिता एकच गर्दी झाली होती.


रवींद्र नागनाथ अलशेट्टी (वय-२२) व व्यंकटसाई सूर्यप्रकाश कत्ती (वय-२४,दोघे रा. नवीन विडी कुंभारी, सोलापूर) असे या अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. एम.एच.१३.डी.क्यू. ४२१० ही अशोक लेलँड वाळूवाहतूक हायवा तुळजापूरकडून सोलापूरच्या दिशेने येत होती. दुचाकी वाहनावरून हे दोघे मयत युवक तुळजापूरहून देवीचे दर्शन घेऊन सोलापूरच्या दिशेने वेगाने निघाले होते. मेजरसाब धाबा समोर ते अचानक या मालवाहतूक ट्रिपर गाडीच्या आडवे आले. त्यामुळे या गाडीची दुचाकीस मागून जोराची धडक बसली. या अपघाताची माहिती तालुका पोलीस ठाण्याला देण्यात आली. तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय राठोड व त्यांचे पथक त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले.

मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. यावेळी बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघात झाल्याने नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. पोलिसांनी येऊन वाहतूक सुरळीत केली. शासकीय रुग्णालय सुद्धा नातेवाईकांनी व मित्रमंडळीने एकच गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments