ट्रक समोरसोरच भिडले, ट्रकसह दोन्हीं चालकांच्या शरिराचाही चेंदामेंदा

 अहमदनगरच्या राहता तालुक्यात ट्रकचा भीषण अपघात झाला.

दोन ट्रक एकमेकांना समोरासमोरच भिडले आणि अपघात घडला. हा अपघात इतका भीषण  होता की दोन्ही ट्रकचा तर चेंदामेंदा झालाच. पण ट्रकमध्ये असलेल्या चालकांनाही जबर मार बसून त्यांच्यावरही काळानं घाला घातला. या अपघातामुळे बेदरकारपणे ट्रक चालवणाऱ्या चालकांना शिस्त कधी लागणार, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय.


राहता तालुक्यातील लोणी-कोल्हार मार्गावर दोन मालवाहू ट्रकची जबरदस्त धडक झाली. समोरासमोर धडक झाल्यामुळे या दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. अपघाताची तीव्रता इतकी जबर होती की दोन्ही मालवाहू ट्रकच्या चालकांचाही जागच्या जागी मृत्यू झाला. संतोष राख आणि सुनील जायभाये अशी मृत्यू झालेल्या चालकांची नावं आहेत.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मालवाहू ट्रकच्या अपघातामुळे लोणी-कोल्हार मार्गावर काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला हटवण्यात आले. त्यानंतर या मार्गावर विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आणण्यात आली.


मालवाहू ट्रकच्या अपघातामुळे अवजड वाहनं बेदरकारपणे चालवणाऱ्या चालकांना शिस्त लावण्याची गरज आता निर्माण झाली आहे. तसंच राज्यातील अपघातांची मालिका सुरूच असल्याचंही यानिमित्ताने पुन्हा पाहायला मिळतंय. या अपघाताची पोलिसांनी नोंद करुन घेतली असून पुढील तपास केला जातो आहे.

विनायक मेटे, सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील रस्ते अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतरही महाराष्ट्रात रस्ते अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. बेशिस्तपणे वाहनं चालवणं, लेन तोडणं, ओव्हरटेकिंगचा नाद, वेगाची मर्यादा न पाळणं, ही अपघात वाढण्याची प्रमुख कारणं असल्याचंही अभ्यासातून समोर आलं होतं.

Post a Comment

0 Comments