सोलापूर; शेजारच्याकडून वीज कनेक्शन घेणे पडले महागात

 सोलापूर : येथील हनुमान नगरातील शिकलकर वस्तीत राहणाऱ्या बरबलसिंग लाखनसिंग दुधनी याच्याकडे विजेचे थकीत बिल असल्याने महावितरणकडून त्याचे कनेक्शन कायमचे बंद केले होते.


तरीपण, त्याने शेजारच्याकडून वायर टाकून वीज घेतली. त्यामुळे महावितरणचे सहायक अभियंता गणेश कोळी यांनी बरबलसिंग याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली.

दरम्यान, फिर्यादी कोळी हे त्यांचे सहकारी स्वप्नील शेप व समीश कोळी यांच्यासोबत वीजबिल वसुलीसाठी गेले होते. त्यावेळी कायमस्वरूपी वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांचाही ते शोध घेत होते. हनुमान नगरातील बरबलसिंग याच्याकडे नऊ हजार ६१० रुपयांची थकबाकी होती. तडजोडणीचे दोन हजार रुपयेही प्रलंबित होते. वारंवार मागणी करूनही त्याने वीजबिल भरले नाही. तरीपण, बरबलसिंग याने घराशेजारील महावितरणचे ग्राहक कलाकोर त्रिपालसिंग टाक यांच्या घरात काळ्या रंगाच्या इनकमिंग वायर टाकून अनधिकृतपणे वीज जोडणी करून घेतलेले त्यांना दिसून आले.


महावितरणचे सहायक अभियंता (वॉटर वर्क्स, उपविभाग ब, सोलापूर शहर) कोळी यांनी त्यासंदर्भात चौकशी केली. त्यावेळी बरबलसिंगने महावितरणचे वीजबिल न भरल्याने त्याचे कनेक्शन कायमचे बंद केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर कोळी यांनी थेट सदर बझार पोलिस ठाणे गाठले. बरबलसिंगविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस नाईक भोगशेट्टी तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments