मंगळवेढा: आधी नुकसानभरपाईच्या कारणावरून पिता - पुत्रास बेदम मारहाण

 

सांगोला तालुक्यातील चोपडी येथील पिता पुत्रास मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथे ७ जणांनी मारहाण करून नुकसान भरपाईपोटी

४० हजार रुपये गुगल पे वरती पाठविण्यास भाग पाडल्याची फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली आहे.


याप्रकरणी योगेश तानगावडे, युवराज तानगावडे, लेंडवे, तानगावडे याचा भाऊजी व अनोळखी तीन इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सांगोला तालुक्यातील संजय आप्पासाहेब बाबर हे दि.२६ ऑक्टोबर रोजी सोलापूर ते सांगोल्याकडे आयशर टेंपोने निघाले असता रोडलगत तीन मोटर सायकलस्वार बोलत थांबले होते.

त्यापैकी एकजण अचानक रोडवरती येवू लागल्याने बाबर यांनी टेंपो रोडच्या आतील बाजूस घेत असताना टेंपोच्या पाठीमागील भाग त्यांच्या हँडलला लागून मोटर सायकल व मोटर सायकलस्वार रोडच्या डाव्या बाजूस खाली पडले.


व दुसरा मोटर सायकलस्वार हा टेंपोच्या मागे लागल्याने बाबर यांनी भितीने सदर टेंपो गणेशवाडी गावाच्या हद्दीतील रोडवरून सर्व्हिस रोडला घेवून गावाच्या दिशेने ते गेले.

त्यानंतर तेथे गणेशवाडी ते मारापूरकडे जाणाऱ्या रोडवर टेंपो लावून खाली उतरले असता पाठीमागून योगेश तानगावडे, युवराज तानगावडे, तानगावडे याचा भाऊजी तसेच दाढी वाढविलेला व पिवळा शर्ट घातलेला लेंडवे नावाचा इसम


यांनी ४.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना व त्यांच्या मुलास नुकसान भरपाई देण्याच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमा करून शिवीगाळी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यावेळेस त्यांनी नुकसान भरपाईपोटी ४० हजार रुपये गुगल पे वरती पाठविण्यास भाग पाडले अशा प्रकारची फिर्याद संजय बाबर यांनी मंगळवेढा पोलिसात दिली असून

पोलिसांनी एकूण ७ जणांविरूध्द भा.दं.वि. सं. कलम ३२६,३२३,५०४ , ५०६ , १४३,१४७,१४८,१४ ९ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments