वडिलांचा खून करून 'दृश्यम' चित्रपटाला शोभेल अशाप्रकारे दोन मुलांनीच प्रेताची विल्हेवाट लावल्याची घटना खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली.
म्हाळुंगे पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करून दोन सख्ख्या भावांना गजाआड केले. धनंजय नवनाथ बनसोडे (वय 43, रा. निघोजे, ता. खेड) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची मुले सुजित धनंजय बनसोडे (वय 21), अभिजीत धनंजय बनसोडे (वय 18) यांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली.
धनंजय नवनाथ बनसोडे यांचा फरसाण बनवण्याचा व्यवसाय असून, त्यांची ग्लोबल फूड्स नावाची कंपनी आहे. मागील आठवड्यात (दि. 16) ते बेपत्ता असल्याची तक्रार महाळुंगे पोलिसात देण्यात आली होती. तपासात बेपत्ता धनंजय बनसोडे यांचे नागपूर येथील महिलेशी तीन वर्षांपासून फेसबुकद्वारे ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यानंतर धनंजय यांच्या घरात पत्नी, मुले – सुजित, अभिजीत यांच्यामध्ये वारंवार वाद होऊ लागले. सदरचे प्रेमसंबंध हे मुलांना मान्य नव्हते. त्यामुळे मुले आपला घातपात करून ठार मारतील, अशी शंका धनंजय यांना आली होती. घातपाताबाबत धनंजय यांनी नागपूर येथील मैत्रिणीला कळविले होते.
म्हाळुंगे पोलिसांनी सुजित व अभिजीत यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली. तेव्हा वडील धनंजय यांचे नागपूर येथील महिलेशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्यामुळे वडिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दोन्ही मुलांनी कबूल केले. त्यामुळे सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली.




0 Comments