शहरातील जे. जे. गल्ली परिसरात किरकोळ कारणावरून दुपारी दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पडसाद संध्याकाळच्या सुमारास उमटले. दोन्ही बाजूंच्या जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली.
यात तीन वाहनांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून, दोनजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मोहसिन नावाच्या एकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे.
शहरातील जे. जे. गल्ली परिसरामध्ये दुपारी किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्याचे पडसाद आज सायंकाळी उमटले. दोन्ही गट सायंकाळच्या सुमारास समोरासमोर आले. यानंतर तुफान दगडफेक करण्यात आली.
यात परिसरातील दुचाकी, चारचाकी वाहनांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम हेसुद्धा या घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींचे फुटेज ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून दगडफेक करणाऱयांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, दगडफेकीमुळे परिसरात दगडांचा खच पडल्याचे दिसून येत होते. याप्रकरणी तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.




0 Comments