घरमालकाला अडीच लाखांचा गंडा घालून भाडेकरू पसार

 

नागाव, ता. ७ : भाडेकरू म्हणून आला, दोन महिने भाड्याने राहिला, घरमालकाकडून रोख दोन लाख रुपये घेतले, रक्कम भरण्यासाठी जाणार असल्याचे कारण सांगून त्यांचीच मोपेड घेतली आणि घरमालकाला अडीच लाख रुपयांचा गंडा घालून 'तो' पसार झाला.


नागाव (ता. हातकणंगले) येथील घरमालक रामानंद कल्लाप्पा मोरे यांनी याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सुरेश अमर पाटील
(वय २९, सध्या रा. नागाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, मूळ रा. हनुमाननगर, १ ली गल्ली, गडहिंग्लज) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, रामानंद मोरे यांचे नागाव येथे चप्पलचे दुकान आहे. 


शिवाय त्यांच्याकडे सहा भाडेकरू राहत आहेत. यापैकी एक सुरेश पाटील हा दोनच महिन्यांपूर्वी राहण्यास आला. आपण एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला असल्याचे त्याने सांगितले होते. त्याच्या कंपनीने ३ फेब्रुवारी रोजी एक अॅक्टिवा मोपेड (एमएच ०९ एफटी ८४८०) ओढून आणली आहे. 


नवीनच असणारी ही मोपेड त्याने श्री. मोरे यांना साठ हजार रुपयांना विकत दिली. त्यानंतर त्याने आणखी चार मोपेड असल्याचे सांगितले आणि त्यासाठी आपण अ‍ॅडव्हान्स रक्कम भरली असल्याच्या पावत्या त्याने श्री. मोरे यांना दाखविल्या. सोमवारी (ता. ६) त्याने चार मोपेड ताब्यात घेण्यासाठी श्री. मोरे यांच्याकडून रोख दोन लाख रुपये घेतले. ही रक्कम भरण्यासाठी जाणार असल्याचे कारण सांगून त्यांना विकलेली मोपेड घेतली आणि मोबाईल स्विच ऑफ करून तो पसार झाला. हवालदिल झालेल्या रामानंद मोरे यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली.


Post a Comment

0 Comments