प्रेमाला नकार दिल्याने तरुणीची हत्या .... शिक्षकासह तिघांना अटक

 

प्रेमप्रकरणातून अकोल्यातील एका तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हत्या करणारा शिक्षक असून, त्याने मित्रांच्या मदतीने हा गुन्हा केला आहे. मुलीला नोकरीचे कारण सांगून ठाणे जिह्यातील किनवली परिसरातील दगडाच्या खाणीत टाकून दिले होते.


जानेवारी 2023मध्ये ही घटना घडली असून, याप्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना राजूर पोलिसांनी अटक केली आहे.

भारती दत्तू खाडे (वय 21, रा. वासाळी, ता. अकोले) असे मृत मुलीचे नाव आहे, तर मुख्य आरोपी दत्तू धोंडू डगळे (वय, 42, रा. वासाळी, ता. अकोले), मनोहर पुनाजी कोरडे (रा. नाशिक) व अमोले शांताराम गोपाळ (रा. वासाळी, ता. अकोले) या तिघांना अटक करण्यात आली आहे.


भारती आणि दत्तू डगळे हे दोघे एकाच गावचे आहेत. डगळे हा शिक्षक असून, तो भारतीवर प्रेम करीत होता. मात्र, मुलीच्या घरच्यांना शंका आली आणि त्यांनी तिला कधी मोबाईल दिला नाही. त्यामुळे दत्तूने गावातील अमोल गोपाळ आणि आणखी एक मित्र मनोहर कोरडे याच्या मदतीने तिच्या घरच्यांच्या मोबाईलवर फोन केला. तुमच्या मुलीला ठाण्यातील चांगल्या कंपनीत जॉब मिळणार आहे. त्यामुळे तिला मुलाखतीसाठी पाठवून द्या, असे सांगितले. त्यानंतर डगळेने भारतीला ठाण्याला नेले. तेथे त्यांच्यात काही चर्चा झाल्या. मात्र, भारतीने त्याला विरोध केल्याने त्याने तिला ठाणे जिह्यातील साकुर्ली येथे नेले. तेथेही वाद झाल्यानंतर डगळेने डोक्यात दगड घालून भारतीचा खून केला. दरम्यान, राजूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद 'अकस्मात मृत्यू' म्हणून झाली होती. या मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, मुलीचे नातेवाईक या घटनेचा वारंवार पाठपुरावा करीत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांची हकिकत ऐकून घेत तपासाला सुरुवात केली होती.


दरम्यान, ठाण्यातील किनवली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. त्यातील मृत मुलीची माहिती मिळत नव्हती. ठाण्याचे पोलीस अधिकारी बच्छाव आणि राजूर पोलीस तपास करीत असताना या मुलीची ओळख पटली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी तपासाला अधिक गती दिली. मोबाईलचा सीडीआर, एसडीआरसह सर्व तांत्रिक बाजू तपासण्यात आल्या. त्यानंतर एकाला ताब्यात घेण्यात आले. त्याने दुसऱयाचे आणि दुसऱयाने मुख्य सूत्रधाराचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शिक्षक दत्तू डगळे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, डगळे, वर्पे, ढाकणे, गाडे, मुंडे यांनी या गुह्याचा तपास केला.


Post a Comment

0 Comments