नगर : सैन्यदल, तसेच शासनाच्या इतर विभागांत सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरूणांची 86 लाखांची फसवणूक केली. तसेच, नियुक्तीसाठीची बनावट कागपत्रे तयार केली.
याबाबत सौरभ भारत शिंदे (रा.कोळगाव, ता.श्रीगोंदा) या तरुणाच्या फिर्यादीवरून तीन जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश बबनराव लहारे (रा.अरणगाव, ता.जि.नगर), रमजान अल्लाबक्ष शेख (रा.टाकळी खातगाव, ता.जि.नगर), जावेद पटेल (रा.गंगापूर, जि.औरंगाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सौरभ शिंदे या तरूणाची 15 लाखांची, तर इतर तरुणांची 71 लाख 28 हजार 500 रुपये, अशी 86 लाख 28 हजार 500 रुपयांची फसवणूक झाली आहे. सौरभ याने सैन्यदलात भरती होण्यासाठी कराड येथील अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, नोकरी लागली नाही. आरोपी लहारे व शेख याचे सौरभच्या गावात येणे-जाणे असल्याने त्यांची ओळख झाली.
शेख याने सौरभला नोकरी लावण्याचे सांगत त्यासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार सौरभने 15 लाख रूपये दिले. तसेच, सौरभ याच्या इतर मित्रांनीही पैसे दिले.
मात्र, काही दिवसांनंतर आपली फसवणूक झाल्याचे सर्वांच्या लक्षात आले. बनावट स्टॅम्प, कागदपत्रे तयार करून आरोपींनी नियुक्तीपत्रेही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.
0 Comments