एसटी बस प्रवास तिकिटात ५० टक्के सुट ! चैत्र वारीसाठी महिला वारकरी जास्त येणार

 

सोलापूर : चैत्र वारीसाठी दोन ते अडीच लाख वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत येतील. राज्य सरकारने एसटी बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली. त्यामुळे महिलांची संख्या मोठी असेल, असा अंदाज ग्रामीण पोलिसांनी वर्तविला आहे.


वारीच्या निमित्ताने राज्य राखीव पोलिस बलाची एक तुकडी आणि इतर दीड हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे.


श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी आषाढी, कार्तिकी, माघ व चैत्र वारीला लाखो भाविक देशभरातून पंढरपूर येथे येतात. चैत्र वारीला आषाढी, माघ वारीएवढी भाविकांची गर्दी नसते. तरीपण, दिंड्यांसोबत चालत पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी ग्रामीण पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर मदत केंद्रे उभारून त्याठिकाणी वारकऱ्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. त्याठिकाणी पाण्याची सोय करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केल्या आहेत.

दरम्यान, अंधार पडल्यावर वारकऱ्यांनी चालू नये, विश्रांती घ्यावी. दिंडी मार्गावर ग्रामीण पोलिसांचे पेट्रोलिंग राहणार आहे. दिंडीत चालत येणाऱ्या वारकऱ्यांनी रिफ्लेक्टर जॅकेट घालावे, दिंडीप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करावी, असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे. यापुढील काळात वारीसाठी पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यास जीव गमवावा लागणार नाही, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.


वारकऱ्यांसाठी जिल्ह्याच्या प्रवेशावर मदत केंद्रे

पंढरीच्या पांडुरंगाची प्रत्येक वारी अपघातमुक्त व्हावी, यासाठी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांचे समुपदेशन केले जात आहे.

- हिंमत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

वारीसाठी 'असा' पोलिस बंदोबस्त

चैत्र वारीसाठी बाहेरील जिल्ह्यातून ३०० अंमलदार आणि ३० अधिकारी बोलावण्यात आले आहेत. तर सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील तीन पोलिस उपअधीक्षक, ११ पोलिस निरीक्षक, ४३ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक देखील बंदोबस्तासाठी असणार आहेत. तसेच ५४४ पोलिस अंमलदार, ६०० होमगार्ड आणि एक राज्य राखीव पोलिस बलाची तुकडी देखील असेल. त्यांच्यावर पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांचे लक्ष असणार आहे


Post a Comment

0 Comments